धुळे: साक्री तालुक्यातील ग्रा. पं.तींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
![ग्रामपंचायत](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2023/03/20181229/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4.jpg)
पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 30 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यामध्ये इंदवे, नांदवन, म्हसाळे, पेरेजपुर, आष्टाणे, कोकले, चिचखेडे, अक्कलपाडा, काळगाव, उमर्टी, उंभरे, हाट्टी बु, फोफरे, लोणखेडे, आमखेल, रूनमळी, नवडणे, कळंभिर, पारगाव, बल्हाणे, पिंपळनेर, दापुर, धंगाई, मैंदाणे, बोपखेल, काकशेवड, लघडवाळ, आमळी, मळगाव प्र.वार्सा, सुरपान, सुरपान, आयणे आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात प्रभागरचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून (दि.6) ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदारांनी प्रत्येक गावाचे नकाशे निश्चित करायचे आहेत. तर 16 तारखेला संबंधित तलाठी व ग्रामसेवकांनी गावांमध्ये संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे अपेक्षित आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत 26 ऑक्टोबरला प्रभाग रचनेची तपासणी केली जाईल. या समितीत गटविकास अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही समिती 3 नोव्हेंबरला प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करेल. तसेच तहसीलदार 4 डिसेंबरला प्रारूप प्रभागरचनेला प्रसिद्धी देतील.
प्रसिद्धीच्या दिनांकापासून ते 11 डिसेंबर या कालावधीत सामान्य जनतेला या रचनेवर हरकती व सूचना नोंदविता येतील. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखल हरकती व सूचनांवर 26 डिसेंबरला सुनावणी घेत अभिप्राय नोंदवून अंतिम प्रभाग रचनेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी 9 जानेवारीला प्रभागरचना अंतिम करून निवडणूक आयोगाकडे सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनुसार जिल्हाधिकारी 16 जानेवारीला अंतिम प्रभागरचनेला प्रसिद्धी देणार आहेत.
हेही वाचा