नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह? | पुढारी

नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

नाशिक/नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा, नाशिकरोड येथील शिंदे गाव औद्योगिक वसाहतीत एमडी या अमली पावडरचीनिर्मिती करणाऱ्या कारखान्यावर साकीनाका पोलिसांनी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा माल हस्तगत केला. या धाडीमुळे नाशिकरोड पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, येथील कारखान्याची माहिती स्थानिक पोलिसांना होती की नव्हती, याविषयी आता उलटसुलट चर्चा केली जाते आहे. याचदरम्यान, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या वडाळा गावातील एका ठिकाणावरही पोलिसांनी छापा टाकल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

संबधित बातम्या :

याबाबत माहिती अशी की, शिंदे गाव एमआयडीसीत असलेला एमडीचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उदध्वस्त करून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे चर्चेत आलेला ललित पाटील कोण आहे, तो कोणत्या राजकीय पक्षाचे काम करतो, या धंद्याचे त्याचे नेटवर्क राज्यभर पसरले आहे की काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तो प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून, ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाला असून, पोलिस यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अनेक पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान ललित हा ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर भूषणने कारखान्यातील तयार माल व सामग्री लंपास केली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. साकीनाका पोलिस तब्बल तीन दिवस नाशिकरोड परिसरात तळ ठोकून होते. पाटील बंधूंचे सर्व बैठकीतले मित्र परिवार पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते.

दुसऱ्या एका घटनेत अमली पदार्थविरोधी पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे यांना वडाळा गावातील सादिकनगरसह एका पत्र्याच्या शेडमध्ये एमडी पावडर (मॅफेडॉन) विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी (दि.५) पोलिसांनी धडक कारवाई करीत वसीम रफिक शेख (३६, रा. सादिकनगर, वडाळा गाव) व नसरीन ऊर्फ छोटी भाभी इन्तियाज शेख (३२, सादिकनगर, वडाळा गाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५४.५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर व १.२८८ किलो ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण एक लाख ८९ हजार २६० रुपये किमतीचा अमली पदार्थ साठा जप्त केला. एका किराणा दुकानात अमली पदार्थ ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी सर्व अमली पदार्थ जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर, हेमंत नागरे, अश्विनी उबाळे, रंजन बेंडाळे, पोलिस हवालदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, गणेश भामरे, विनायक आव्हाड, नितीन भालेराव, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, गणेश वडजे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांनी सहभाग घेतला होता.

असा उघड झाला प्रकार

साकीनाका पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांनी एका आरोपीस अटक केली. त्याच्या माहितीवरून साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांची मदत घेत शिंदे गाव एमआयडीसीत असलेल्या एमडीच्या कारखान्यावर बुधवारी रात्री छापा टाकला. हा कारखाना ललितचा लहान भाऊ भूषण पाटील चालवत होता. तो त्या ठिकाणी कच्चा माल आणून एमडी बनवत होता. सदरची जागा यादव नामक व्यक्तीच्या मालकीची असून, ललित याने ती भाडेतत्त्वावर घेतली होती. त्या ठिकाणी जिशान इकबाल शेख हा कामगार म्हणून काम करायचा. त्यास साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरून एक किलो ८०० ग्रॅम एमडी व तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा कोट्यवधींचा माल हस्तगत केला आहे.

आमदाराचा दबाव

गुरुवारी सायंकाळी 5.30 ला धाड टाकल्यानंतर पंचनाम्याअंती संशयितांना ताब्यात घेतल्यावर पथक आयुक्तालयात पोहोचले. तेव्हा काही लोकप्रतिनिधींसह शहरातील महिला आमदारांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. महिला संशयिताला सोडण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा होणारा वापर आयुक्तालयाने झुगारला. तातडीने फिर्याद नोंद करण्यासह न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयितांना अटक करण्यात आली. शुक्रवारी पहाटे 3.30 पर्यंत कसून चौकशी केल्यानंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. शहरातील ड्रग्जविक्री व वापराला राजकीय नेतेच पाठीशी घालत असल्याची बाब या गुन्ह्याच्या तपासावेळी समोर आल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button