जागतिक स्पर्धेत नंदुरबारचे नाव झळकवणाऱ्या नारायणीची पालकमंत्र्यांकडून दखल | पुढारी

जागतिक स्पर्धेत नंदुरबारचे नाव झळकवणाऱ्या नारायणीची पालकमंत्र्यांकडून दखल

नंदुरबार – कोलकता येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतांना नंदुरबारच्या नारायणी उमेश मराठे हिने सुवर्णपदक पटकावून नंदुरबार जिल्ह्याचे नाव देशात पोहचविले, याचा संपूर्ण जिल्हावासीयांना आणि आम्हालाही सार्थ अभिमान आहे; अशा शब्दात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी लहानग्या नारायणीचे कौतुक करीत शाबासकी दिली.

नारायणी  हिने नंदुरबार जिल्ह्याला लौकिक मिळवून दिला म्हणून आपल्या निवासस्थानी बोलावून घेत पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नारायणी आणि तिच्या पालकांचे कौतुक केले. तसेच “आता ती आशिया खंडात आणि जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा नक्कीच फडकवेल”; असा विश्वास व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या व विशेष अभिनंदन केले. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील,  संजय शहा, नारायणी हिचे नातलग आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.

 कोलकता येथे 36 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नंदुरबारच्या नारायणी उमेश मराठे हिने सुवर्णपदक पटकावून जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केले असून भारत सरकार तर्फे ती आशिया खंडात आणि जागतिक पातळीवर खेळणार आहे. तिचे वडील उमेश मराठे हे रेल्वेत वर्ग चार कर्मचारी आहेत, तर आई अश्विनी मराठे साधी गृहिणी आहे. तरीही त्यांनी बुद्धिबळ खेळासाठी पोषक वातावरण तयार करून नारायणी च्या स्वप्नांना बळ दिले. हे जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी लहानग्या नारायणीचे कौतुक करीत शाबासकी दिली.

हेही वाचा :

Back to top button