Nashik News : कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढलं पण; महिलेला चार लाखांचा गंडा | पुढारी

Nashik News : कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढलं पण; महिलेला चार लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढून ते पैसे बँकेत ठेवणाऱ्या महिलेस भामट्यांनी ऑनलाइन गंडा घातला. सायबर भामट्यांनी महिलेच्या बँक खात्याती माहिती मिळवत स्क्रीन शेअरिंग ॲपच्या माध्यमातून चार लाख रुपये परस्पर काढून महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी मूळच्या ओडिशा राज्यातील व सध्या म्हसरूळ भागात राहणाऱ्या महिलेने सायबर पाेलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार फिर्याद दाखल केली आहे.

मीनाक्षी प्रसन्ना नायक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी काही महिन्यांपूर्वी पाच लाख रुपयांचे खासगी कर्ज घेतले हाेते. दरम्यान, मीनाक्षी यांच्या बँक खात्यात चार ते पाच लाख रुपये रक्कम असल्याची माहिती सायबर भामट्यांनी ऑनलाइन मिळविली होती. त्यानंतर दि. २३ व २४ मे २०२३ राेजी संशयितांनी मीनाक्षी यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला व ‘आम्ही इंडिया लेंड्स कंपनीतून बाेलत आहे. तुमचे कर्ज आम्ही मंजूर केले. त्यानुसार ते परतफेड करण्याची पद्धत सांगताे’ असे म्हणत त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यानुसार त्यांना बाेलण्यात गुंतवून ठेवत कर्जासह बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर मीनाक्षी यांच्या फाेनवर संशयितांनी एक लिंक पाठवली. त्या माध्यमातून स्क्रीन शेअरिंग ॲपचा वापर करून भामट्यांनी बँक खात्याचा ॲक्सेस मिळविला. तसेच मीनाक्षी यांच्या बँक खात्यांमधून ३ लाख ९८ हजार ८२७ रुपये परस्पर काढून घेतले. दरम्यान, मीनाक्षी यांच्या बँक खात्यातील पैसे सायबर चाेरट्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग केल्याचे समाेर आले आहे. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात संबंधित मोबाइल क्रमांकधारकासह ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले आहेत, त्या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button