Nashik News : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना वेळेची मर्यादा

रौद्रशंभो वाद्यपथक, नाशिक
रौद्रशंभो वाद्यपथक, नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत झालेल्या बैठकीत प्रत्येक मंडळाला मागील वर्षाप्रमाणेच क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच मिरवणूक मार्गात महत्त्वाच्या चौकांमध्ये प्रत्येक मंडळाला २० मिनिटे वाजंत्री वाजवण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मिरवणूक रेंगाळणार नाही व प्रत्येक मंडळाचा देखावा मिरवणुकीत सहभागी होण्यास संधी मिळेल, असे सर्वानुमते ठरवण्यात आले. (Nashik News)

दरम्यान, बैठकीत मागील वर्षी काही मंडळांनी त्यांची मिरवणूक एकाच चौकात बराच वेळ थांबवल्याने इतर मंडळांचे गणपती पुढे जाऊ शकले नाहीत, अशी तक्रार केली होती. त्यामुळे दोन मंडळांमध्ये अंतर पडले होते. या कारणावरून बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. एकमेकांच्या मंडळांचा क्रमांक मागे-पुढे करण्यावरून वाद झाल्यानंतर सर्वानुमते मागील वर्षाचीच यादी मंजूर करण्यात आली आहे. (Nashik News)

संबधित बातम्या :

भद्रकाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २६) झालेल्या गणेश विसर्जन मिरवणूक नियोजन बैठक झाली. या बैठकीत पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे, प्रथमेश गिते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत मिरवणुकीतल्या सहभाग क्रमांकावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. गतवर्षी 11 वाजता मिरवणूक सुरू करूनही रात्री 12 वाजता 13 क्रमांकाचे मंडळ मेहेर सिग्नलपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ज्या मंडळांमुळे मिरवणूक रेंगाळली त्या मंडळांना मागचे क्रमांक देण्याची मागणी झाली. त्यावरून अर्धा तास पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर दावे-प्रतिदावे केले. त्यानंतर मोजक्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा करून गतवर्षीच्याच क्रमांकांना मंजुरी देण्यात आली. (Nashik News)

बैठकीत झालेले निर्णय

सकाळी १० वाजता मंडळे मिरवणुकीच्या ठिकाणी जमतील. 11 वाजता मिरवणूक सुरू केली जाईल. प्रमुख पाहुणे वेळेत आले नाहीत, तरी मिरवणुकीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळेत मंडळांचा देखावा, ढोल पथक न आल्यास त्यांना मिरवणुकीच्या शेवटी प्राधान्य देण्यात येईल. मिरवणूक मार्गांमधील मुख्य चौकांमध्ये मंडळे फक्त १५-२० मिनिटे थांबतील. गुलाल, डीजेचा वापर होणार नाही. ढोल पथकांमध्ये वादक संख्या मर्यादित असेल. मिरवणूक रेंगाळल्यास संबंधित मंडळावर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मिरवणुकीतील मंडळांचा सहभाग क्रमांक

नाशिक महानगरपालिका, रविवार कारंजा मित्रमंडळ (चांदीचा गणपती), गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणेश), श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ पेठ रोड, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), सरदार चौक मित्रमंडळ, रोकडोबा मित्रमंडळ, शिवसेवा मित्रमंडळ, शिवमुद्रा मित्रमंडळ (मानाचा राजा), युवक मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनैश्वर युवक समिती चौक मंडई, नेहरू चौक मित्रमंडळ पिंपळपार, वेलकल सहकार्य मित्रमंडळ, गणेश मूकबधीर मित्रमंडळ, युवा संघर्ष प्रतिष्ठान, गजानन मित्रमंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन, उत्कर्ष मित्रमंडळ नाईकवाडीपुरा या क्रमाने मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील.

मानाचा गणपती कोणता?

मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग क्रमांकावरून झालेल्या वादात मानाचा गणपती कोणता यावरून चर्चा झाली. पहिली सात मंडळे मानाची असल्याने त्यानंतरच्या क्रमांकामध्ये फेरफार करण्याची मागणी झाली. मात्र पहिली सात मंडळे मानाची आहेत, हे कोणी ठरविले? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना विचारला. त्यामुळे पोलिसांनी क्रमांक ठरविण्याचा निर्णय मंडळ पदाधिकाऱ्यांवर सोपविला. सात नव्हे, तीनच मंडळे मानाची असल्याचा मुद्दा काहींनी मांडला, तर एकही मंडळ मानाचे नसून केवळ पूर्वीप्रमाणे यादीत नोंद असल्याने तसा क्रम असल्याचा दावा काही पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे मानाची मंडळे कोणती याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना विचारणा केली. परंतु, त्याचे उत्तर मिळाले नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news