Mumbai Ganesh Visarjan : उद्या गणेश विसर्जनालाच मोठी भरती | पुढारी

Mumbai Ganesh Visarjan : उद्या गणेश विसर्जनालाच मोठी भरती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  अरबी समुद्राला अनंत चतुर्दशी दिवशी मोठी भरती असल्यामुळे समुद्रात दुपारी ११ वाजता ४.५६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे दुपारी बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्रावर जाणाऱ्या गणेश भक्तांनी सावधगिरी बाळगावी. समुद्राच्या पाण्यात खोलवर न जाता कमी पाण्यात विसर्जन करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरात अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजेच गुरुवार २८ सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बाप्पांचं काही घरगुती बाप्पांचेही विसर्जन होणार आहे. बाप्पाच्या विसर्जनाला सायंकाळी होणारी गर्दी लक्षात घेऊन, अनेकजण दुपारीच बाप्पाचे विसर्जन करतात. मात्र गुरुवारी दुपारी ११ वाजता अरबी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनात विघ्न येऊ शकतात. समुद्राला भरती असल्यामुळे उंच लाटा उसळणार आहेत. अशावेळी विसर्जनासाठी खोल पाण्यात जाणे धोक्याचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मूर्ति सोबत समुद्रात जातात मात्र भरतीच्या काळात कार्यकत्यांनी समुद्रात जाऊ नये, विशेष म्हणजे विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही आपल्या मुलांसह समुद्रकिनाऱ्यावर अथवा समुद्राच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

समुद्राला मोठी भरती असल्यामुळे घरगुती व चार फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे. यासाठी पालिकेने प्रत्येक विभागांमध्ये कृत्रिम तलाव तयार केली आहेत. दरम्यान गुरुवारी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्त्यांचे विसर्जन होत असल्यामुळे शुक्रवारी उशिरापर्यंत मुंबईत विसर्जन सुरू असते. शुक्रवारीही दुपारी ११.३७ वाजता अरबी समुद्राला मोठी भरती आहे. यावेळी ही समुद्रात ४.७१ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे.

Back to top button