Pune Ganeshotsav 2023 : धूमधडाक्यात निघणार मानाच्या, प्रमुख गणपतींची विसर्जन मिरवणूक | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : धूमधडाक्यात निघणार मानाच्या, प्रमुख गणपतींची विसर्जन मिरवणूक

पुणे : ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि उत्साहात, आनंदात यंदा मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. सुरेल नगारावादन, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, सामाजिक जागृतीचा संदेश मिरवणुकीतून दिला जाणार असून, मिरवणुकीत यंदा मंडळांचे रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहेत. पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची देदीप्यमान परंपरा पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.

मिरवणुकीस अनंत चतुदर्थीला म्हणजेच गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथून सुरुवात होईल. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि गणरायाची आरती करून मानाच्या आणि मुख्य गणपतींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होईल. चांदीच्या पालखीतून, फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे वादन, बँडची सुरावट असेल. तसेच, रांगोळीच्या पायघड्याही मिरवणूक मार्गांवर घालण्यात येतील. गणरायाला निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून, विसर्जन मिरवणुकीसाठीची मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. वैभवशाली मिरवणुकीने लाडक्या बाप्पाला निरोप दिला
जाणार आहे.

मानाचा पहिला

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

गणरायाची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघेल. सकाळी उत्सव मंडपातून विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. गणरायाची आरती झाल्यावर मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता मुख्य मिरवणूक मार्गाकडे मार्गस्थ होणार आहे. मिरवणुकीमध्ये नगारखाना, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचे पथक सहभागी होणार आहेत. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा निनाद मिरवणुकीत ऐकायला मिळणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरून पालखी घेऊन निघणार आहेत. यंदा मिरवणूक दरवर्षीपेक्षा लहान करण्यात येत असून, मिरवणूक लवकर संपण्यासाठी मंडळाचा प्रयत्न राहणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले.

मानाचा दुसरा

श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

सकाळी नऊ वाजता उत्सव मंडपासून श्री गणरायाची मूर्ती पालखीत विराजमान होऊन मिरवणुकीचे प्रस्थान होईल. सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीमध्ये पारंपरिक पोशाखात अश्वारूढ कार्यकर्ते हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील. यंदा सतीश आढाव यांचे नगारावादन, समर्थ प्रतिष्ठान, ताल ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे. पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी होतील. विष्णुनादचे कार्यकर्ते पालखीपुढे शंखनाद करतील. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने खास शिवराज्याभिषेक रथ तयार केला असून, मिरवणुकीमध्ये त्यांचे सादरीकरण पाहता येईल. यंदा प्रथमच न्यू गंधर्व ब्रास बँडचे वादक हनुमान चालिसा आणि मंगल अमंगल हरी ही रामायण चौपाई वाजविणार आहेत.

मानाचा तिसरा

गुरुजी तालीम मंडळ

स्वप्निल व सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी बनविलेल्या जय श्रीराम ‘रामराज्य’ या फुलांच्या आकर्षक रथात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान असणार आहे. सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन, गंधर्व ब्रास बँडचे बहारदार वादन पुणेकरांचे लक्ष वेधणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा (फुलगाव) यांचे प्रात्यक्षिके व ढोल-ताशा पथकांचे वादन ऐकायला मिळेल. नादब्रह्म ढोल-ताशा पथक आणि नादब्रह्म ट्रस्ट ढोल-ताशा पथकाचा निनाद मिरवणुकीत दुमदुमणार आहे.

मानाचा चौथा

श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट

यंदा गणपतीची मिरवणूक महाकाल रथातून निघणार आहे. हा रथ 28 फूट उंच असून, फुलांनी सजविलेली 12 फूट उंचीची श्री महाकालची पिंड प्रमुख आकर्षण असणार आहे. लकडी पुलाजवळील मेट्रो पुलामुळे उंचीला मर्यादा असल्याने यंदा पहिल्यांदाच रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पुष्पसजावटकार सरपाले बंधूंनी रथाची सजावट केली आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते, त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी उज्जैनवरून खास अघोरी महाराज यांचा सहभाग असणार आहे. तसेच, बाहुबली महादेव हे आकर्षण असणार आहे. मिरवणुकीत अग्रस्थानी लोणकर बंधूंचा नगारावादनाचा गाडा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, शिवप्रताप वाद्य पथक सहभागी होणार आहे.

मानाचा पाचवा

केसरीवाडा गणपती

अनंत चतुर्दशीला वाजतगाजत मिरवणूक निघणार आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. विविध फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत श्रीगणेश मूर्ती विराजमान असणार आहे. मिरवणुकीत गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक हे सहभागी होणार आहेत. बिडवे बंधूंच्या नगारावादनासह मिरवणुकीत शिवमुद्रा, श्रीराम आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथकांचे वादन पुणेकरांना ऐकायला मिळणार आहे. तर इतिहासप्रेमी मंडळाकडून चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक हा देखावाही मिरवणुकीत असेल.

  • प्रमुख गणपती मंडळे

अखिल मंडई मंडळ

‘विश्वगुरू’ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची विसर्जन मिरवणूक निघेल. श्री स्वामी समर्थ यांची 10 फूट उंचीची मूर्ती रथावर असून, श्री दत्त महाराज यांचे थ—ीडी चित्र रथावर साकारण्यात आले आहे. स्वामींच्या मूर्तीमागे श्रीयंत्र असणार आहे. कर्दळी वनात वाळूतून प्रगट झालेले श्री स्वामी समर्थ, अशी सजावटीची संकल्पना आहे. विशाल ताजनेकर यांनी रथाचे कलादिग्दर्शन केले आहे. या रथावर विविध लाइट्स लावण्यात येणार आहेत. रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, 30 फूटची उंची अडथळा येईल तिथे 15 फूट होणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा असणार आहे. त्यामागे गंधर्व बँडचे वादन होईल. तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह आणि नादब—ह्म ढोल-ताशा पथक ट्रस्टचे वादन ऐकायला मिळेल. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिरवणूक निघणार आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

श्री गणेशमूर्तीची मिरवणूक फुलांनी सजविलेल्या 132 वर्षे जुन्या पारंपरिक लाकडी रथातून निघणार आहे. वाजतगाजत बाप्पाची मिरवणूक सायंकाळी सात वाजता निघेल आणि यंदाही ढोल-ताशा पथकांचे वादन आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. समर्थ प्रतिष्ठान, रमणबाग पथक आणि श्रीराम ढोल-ताशा पथकांचा निनाद मिरवणुकीत ऐकायला मिळणार आहे. तर त्यासोबतच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही मिरवणुकीचे केंद्रबिंदू असतील. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघणार असून, कार्यकर्तेही मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

श्री गणाधीश रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होणार आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत आहे. आकर्षक रंगांमध्ये विविध लाइट्स रथावर वापरण्यात आले आहेत. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरून केली जाणार आहे. मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. दरवर्षी मिरवणुकीला होणारा उशीर लक्षात घेऊन यंदा सायंकाळी चार वाजता मंडळ मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.

हेही वाचा

Pune Fire : पुण्यात मोठी दुर्घटना टळली! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आरती करताना लागली आग

Karnataka | बंगळूर-मंगळूर महामार्गावर भीषण अपघात, ४ ठार

अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे  

Back to top button