Dengue in nashik | नाशिक शहरात डेंग्यूचा हैदोस; २१ दिवसांत १९६ नवे रुग्ण | पुढारी

Dengue in nashik | नाशिक शहरात डेंग्यूचा हैदोस; २१ दिवसांत १९६ नवे रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, शहरात डेंग्यूच्या साथीने हैदोस घातला आहे. गेल्या २१ दिवसांतच या आजाराचे तब्बल ८४० नवे संशयित रुग्ण आढळले असून, आतापर्यंत १९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा ४५७ वर पोहोचला आहे. यामुळे नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. (Dengue in nashik)

जुलैपर्यंत शहरात डेंग्यूचे १४४ रुग्ण होते. ऑगस्टपासून पाऊस गायब असल्याने डेंग्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. परंतु, ऑगस्टमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिकच वाढत गेला. एकट्या ऑगस्टमध्ये या आजाराचे ११७ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ९९ रुग्ण होते. यंदा मात्र पावसाळा कमी असतानाही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत गेला. सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. दि. १ ते २१ सप्टेंबर दरम्यान शहरात ८४० डेंग्यू संशयित रुग्ण आढळले आहेत. या संशयिताचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, त्यापैकी १९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे डेंग्यूबाधितांचा आकडा आता ४५७ वर गेला आहे. (Dengue in nashik)

संबधित बातम्या :

रुग्णसंख्येचा हा आकडा सरकारी असून, प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यू बाधितांचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे नाशिकमध्ये वाढत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांबाबत आरोग्य विभागाने चिंता व्यक्त करत, महापालिकेची कानउघाडणी केली आहे. डेंग्यूचा प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. मात्र त्यानंतरही डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डेंग्यूनिर्मूलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिकूनगुनियाचीही ‘एंट्री’

एकीकडे डेंग्यूने शहरात हैदोस माजविला असताना चिकूनगुनिया आजारानेही डोके वर काढले आहे. या महिन्यात चिकूनगुनियाचे दोन संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी सिडकोत राहणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा :

Back to top button