Nashik Murder : पंचवटीत गळा आवळून महिलेचा खून, रस्त्यालगत गोणीत आढळला मृतदेह | पुढारी

Nashik Murder : पंचवटीत गळा आवळून महिलेचा खून, रस्त्यालगत गोणीत आढळला मृतदेह

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा ; म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ रस्त्यालगत एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असून, गळा आवळून महिलेचा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस मृत महिलेसह तिच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

मंगळवारी (दि.२६) सकाळी नाशिक-दिंडोरी रोडवर रस्त्यात गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. परिसरातून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, म्हसरूळचे वरिष्ठ निरीक्षक राजू पाचाेरकर आदी पोलिस घटनास्थळी गेले. पाेलिसांनी पंचनामा करीत मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाजवळ आढळलेल्या गाेणीजवळ दुसऱ्या पिशवीत महिलेचे कपडे, दाेन-तीन भांडे आढळून आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन केले असता महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाच्या शरीरावर किरकाेळ जखमा आढळल्या असून, गळ्यात एक पिवळ्या धातूच्या मण्यांचे मंगळसूत्र व कानातील जाेड आढळले आहेत. कांदा-बटाट्याच्या गोणीत मृतदेह आढळला असून, तीन ते चार दिवसांपूर्वी महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी महिलेची व खून करणाऱ्याची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचे एक पथक ग्रामीण हद्दीत गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

रस्त्याच्या कडेलगत एका गोणीत मृतदेह असल्याची माहिती काही सजग नागरिकांनी म्हसरूळ पोलिसांना दिली. तत्काळ घटनास्थळी आल्यानंतर कांद्या-बटाट्याच्या लाल गोणीत मृतदेह आढळला असून, दोन – तीन दिवसांपासून मृतदेह टाकला असल्याचे प्राथमिक दर्शनी निदर्शनास आले आहे. या ठिकाणी काही कपडे, वस्तूदेखील आढळून आल्या आहेत.

– राजू पाचोरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ, पोलिस ठाणे

हेही वाचा :

Back to top button