उमेदवारी हवी असेल तर भाजपमध्ये या! आ. नितेश राणे यांचे किरण सामंतांना खोचक आवतण | पुढारी

उमेदवारी हवी असेल तर भाजपमध्ये या! आ. नितेश राणे यांचे किरण सामंतांना खोचक आवतण

कणकवली, पुढारी वृत्तसेवा : आपल्या भावाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा मंत्री उदय सामंत यांची असेल तर तुम्ही शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर रहा आणि भाऊ किरण सामंत यांना भाजपमध्ये पाठवा. मग आमचे पक्षश्रेष्ठी विचार करतील आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवू. मग कोणच दुखावणार नाही. किरण सामंत हे माझ्या माहितीत कोणत्याच पक्षाचे नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये यावे मग त्यांचा विचार होईल, असे खोचक आवतण भाजपचे आ. नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिले.

सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आ. नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

आ. राणे म्हणाले, उदय सामंत हे आमच्या महायुतीचे नेते आहेत, जबाबदार मंत्रीसुद्धा आहेत. त्यांनी दावे किंवा आपआपसात टीकाटिप्पणी करू नये. महायुतीच्या बैठका होणार आहेत. ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही जागा कोणाला मिळणार हे आज जाहीर करण्याचा कोणालाच अधिकार नाही. कारण पक्षाच्या फोरमवर ही चर्चा होणार आहे. हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे. कोण कुठे लढणार, याला महत्व नाही.

रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा महायुतीचीच निवडून आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही काही भूमिका मांडली आहे. आम्ही काही आकडेवारी मांडली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही भूमिका मांडली आहे. कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही कळवले आहे, त्यामुळे मला वाटते की, मंत्री उदय सामंत यांनी घाई करू नये.

Back to top button