

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बबन घोलप आमच्याकडे आले, तर आम्ही नाही म्हणणार नाही. त्यांनी ती निवड करायची आहे. आम्ही कुणाला आमच्या पक्षात या, असे म्हणत नाही, असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नाशकात पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता असून, घोलप आता भाजपत जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबधित बातम्या :
शिर्डी लोकसभेच्या जागेवरून उद्धव ठाकरे गटात सुंदोपसुंदी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावरून ठाकरे गटातील माजी मंत्री बबन घोलप हे नाराज आहेत. त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामाही पक्षनेत्यांकडे सुपूर्द केला होता. मात्र, पक्षाने तो नाकारत घोलप यांना प्रतीक्षेत ठेवले आहे. आपली नाराजी त्यांनी पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ते बबन घोलप यांचे सुपुत्र आहेत. पाठोपाठ बबन घोलप यांनीदेखील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता ठाकरे गट या वादात कसा मार्ग काढतो ते पाहावे लागेल. कारण ठाकरे गटातून बाहेर पडल्यास भाजपसुद्धा घोलप यांना पक्षात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. बबन घोलप यांच्या कन्या आणि स्थानिक भाजप नेत्या तनुजा घोलप यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बावनकुळे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा :