Mumbai Ganeshotsav : शेव, बुंदी, डाळ, पफ वापरून साकारली विलोभनीय मूर्ती | पुढारी

Mumbai Ganeshotsav : शेव, बुंदी, डाळ, पफ वापरून साकारली विलोभनीय मूर्ती

मुंबई : गिरगावातील जितेकरवाडी गणेशोत्सव मंडळाने शेव, बूंदी, डाळ व पफ अशा पदार्थांचा वापर करून बाप्पाला स्मार्ट रूप देत विलोभनीय व गोंडस मूर्ती साकारली आहे. परिसरात सध्या मूर्तीची मोठी चर्चा असून, गणपतीचे हे रूप पाहण्यासाठी जितेकरवाडीत प्रचंड गर्दी होत आहे. (Mumbai Ganeshotsav)

मंडळाच्या तरुण कार्यकत्यांनी यंदा काहीतरी हटके व वेगळे करण्याच्या हेतूने आकर्षक व सुंदर गणपतीची मूर्ती साकारताना नारंगी शेव, बटाटा शेत्र, हिरवी पिवळी शेव, नारंगी बुंदी, हिरवी, पिवळी बुंदी चणाडाळ, ज्वारी पफ आणि सोयाबीन पेरी पेरी ह्या पदार्थांचा वापर केला आहे. मूर्तीची सजावट पूर्ण झाल्यानंतर मूर्तीवर भडक रंगाचा हात मारून गणपतीचे रूप अधिक खुलवण्यात आले आहे. त्यामुळे या बाप्पाचे रूप अतिशय विलोभनीय व गोंडस दिसत आहे. थोरामोठ्यांसह चिमुकले दर्शनासोबतच सेल्फी घेण्यासाठी मंडपात गर्दी करीत आहेत. (Mumbai Ganeshotsav)

मंडळ विद्युत रोषणाई, महागडे डेकोरेशन यापेक्षा दरवर्षी मूर्तीच्या सजावटीकडे लक्ष देते. गेल्या वीस वर्षांपासून मंडळातर्फे खाद्यपदार्थ व वापरातील वस्तूंपासून मूर्तीची सजावट केली जाते. याआधी कॅडबरी, ड्रायफ्रूट तसेच १२५ वर्षी केकपासून बनवलेला गणपती प्रसिद्ध झाला होता. यापूर्वी खेळातील गोट्या, गरम मसाले अशा वस्तूंपासूनही गणेश मूर्ती साकारल्या आहेत. मूर्तीवर खाद्यपदार्थ किंवा अन्य वस्तु चिकटवण्यापूर्वी गणेशोत्सवाच्या दहा दिवस आधी परीक्षण केले जाते. विसर्जन केल्यावर पाणी दूषित होऊ नये व जलचरांना हानी पोहोचू नये याची मंडळ विशेष काळजी घेते, असे पिटकर यांनी सांगितले.

जितेकरवाडी गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील दुसरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून, यंदा मंडळाने १३० व्या वर्षात पर्दापण केले आहे. लोकमान्य टिळकांनी केशवजी नाईक चाळीत गणेशोत्सवाची सुरुवात केल्यानंतर या मंडळाने पहिल्यांदा सर्वात मोठ्या गणेश मूर्तीची स्थापना केली होती. या चाळीचे मालक मुस्लिम असूनही ते गणेशोत्सवात नेहमीच सहकार्य करतात.
अजित पिटकर, पदाधिकारी, जितेकरवाडी गणेशात्सव मंडळ

  • पूर्वी जितेकरवाडीत मराठी, गुजराती समाजातील अनेक कुटुंब राहत. सर्वजण एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करीत. चाळीतील अनेक कुटुंब नंतर इतरत्र राहायला गेली. सध्या फक्त ३० मराठी कुटुंब जितेकरवाडीत राहतात. अर्थात, हा उत्सव पुर्वीसारखाच धूमधडाक्याने साजरा होतो. (Mumbai Ganeshotsav)

हेही वाचा : 

 

Back to top button