नाशिक : सिंहस्थ निधीतून दारणा धरण पाणीपुरठा योजना, आराखडा एक हजार कोटींवर | पुढारी

नाशिक : सिंहस्थ निधीतून दारणा धरण पाणीपुरठा योजना, आराखडा एक हजार कोटींवर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या कोट्यवधी साधू-महंत व भाविकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तब्बल एक हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. दारणा धरण थेट पाणीपुरवठा योजनेचा समावेश या आराखड्यात करण्यात आला असून दारणा धरणावर पंपींग स्टेशनची उभारणी, थेट जलवाहिनी, विल्होळी येथे १३७ दललि क्षमतेचे नवीन जलशुध्दीकरण केंद्र तसेच विल्होळी येथील साठवण टाकीपासून गांधीनगर, नाशिकरोड तसेच पंचवटीतील साधुग्रामपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी या आराखड्यात तब्बल ६८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

संबधित बातम्या :

२०२७-२८ मध्ये नाशकात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत प्रारूप आराखडे तयार केले जात आहेत. सिंहस्थ काळात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात दारणा धरण थेट जलवाहिनी योजनेचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत दारणा धरण येथे २५० दशलक्ष क्षमतेच्या पंपींग स्टेशनची उभारणी तसेच पंपीग स्टेशन ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनीची टाकली जाणार आहे. विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथे १३७ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुध्दीकरण केंद्र, विल्होळी येथील साठवण टाकीपासून गांधीनगर, नाशिकरोड व पंचवटीतील साधुग्रामपर्यंत १८०० मि.मी. व्यासाची ५० किलोमीटर लांबींची मुख्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. साधुग्राम येथे २० दशलक्ष लिटर क्षमतेचे २० मीटर उंचीचे जलकुंभ उभारले जाणार आहेत. साधुग्राम व भाविक मार्गासाठी ६०० ते १५० मिमी व्यासाची १८ कि.मी. लांबीची मुख्य गुरूत्व वाहिनी तसेच मुख्य व शाखा वितरण वाहिण्या टाकण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय आवश्यकता भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी २४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. साधुग्रामकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला व वाहनतळाच्या जागेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गंगापूर, मुकणेवर वाढीव क्षमतेची पंपींग मशिनरी

गंगापूर धरण व मुकणे धरण येथे वाढीव क्षमतेचे पंपीग मशिनरी व विद्युतविषयक कामांसाठी प्रत्येकी २० कोटी, पंचवटी, बारा बंगला व शिवाजीनगर येथील जलशुध्दीकरण केंद्रांवर पंपींग मशिनरी बसविण्यासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनपा जलशुध्दीकरण केंद्रांवर आवश्यक केमिकल्स खरेदी व इतर साहित्य पुरवठ्यासाठी दीड कोटींची तरतूदही सिंहस्थ आराखड्यात करण्यात आली आहे.

अशा आहेत आराखड्यातील तरतुदी

* दारणा धरण थेट पाणीपुरवठा योजना, विल्होळी येथे नवीन जलशुध्दीकरण केंद्र, ५० कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी- ू६८० कोटी.

* साधुग्राम येथे २० दशललि क्षमतेचा २० मीटर उंचीचा जलकुंभ – ५ कोटी

* साधुग्राम व भाविक मार्ग येथे जलवाहिन्या – २४० कोटी

* साधुग्रामकडे येणारे रस्ते व वाहनतळांच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था – २५ कोटी

* गंगापूर धरणासाठी नवीन पंपिंग मशीनरी बसविणे – २० कोटी

* मुकणे धरणासाठी नवीन पंपींग मशिनरी बसविणे- २० कोटी

हेही वाचा :

Back to top button