तिची मान वळते 360 अंशांत! | पुढारी

तिची मान वळते 360 अंशांत!

वॉशिंग्टन : आपली डान्स स्टेप उठावदार असावी, असे प्रत्येकाला वाटते. आता प्रत्येकालाच ते शक्य होत नाही; पण काही जण असे असतात, ज्यांचे शरीर अतिशय लवचिक असते आणि ते आपल्याला हवे त्याप्रमाणे वळवू वा वाकवू शकतात. पण सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यातील कन्येची कर्तबगारी पाहिली तर लवचिकता देखील किती पराकोटीची असू शकते, यावर विश्वास बसत नाही. साईट इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओत एक कन्या डान्स स्टेपदरम्यान आपली मान चक्क 360 अंश कोनातून फिरवते आणि क्षणभर त्यावर कसा विश्वास ठेवावा, हाच प्रश्न पडतो.

या व्हिडीओत सदर कन्या काळ्या रंगाच्या पेहरावात दिसून येते. नंतर ती डान्स स्टेप सुरू करते आणि या डान्स स्टेपदरम्यान अचानक आपली मान 180 डिग्रीपर्यंत वळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देते. या कन्येचा हा डान्स निव्वळ थक्क करणारा तर आहेच. याच युवतीचा आणखी एक व्हिडीओ असून त्यात ती ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये आपले अनोखे कौशल्य दाखवताना दिसून येत आहे.

आता ही कन्या कोण आहे, याचा काहीही पत्ता लागू शकलेला नाही; पण आपल्या या अनोख्या कौशल्याने तिने नेटिझन्सची मने जिंकण्यात कसर सोडलेली नाही. डान्सच्या या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद मिळत असून त्यावर अनेकांनी असंख्य कमेंटस् केल्या आहेत. एका इन्स्टाग्राम यूझरने म्हटले, ‘या कन्येला एखाद्या हॉरर चित्रपटात काम देणे अधिक योग्य ठरेल’. आणखी एका यूझरने याचे वर्णन भीतीदायक असे केले तर अनेकांनी तिचे कौतुकही केले.

Back to top button