

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित वस्तुंच्या खरेदी – विक्रीच्या व्यवहारातून चांगले कमिशन देण्याचे आमीष दाखवून भामट्याने शहरातील एका तरुणाची १ लाख ६९ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सागर प्रसाद सुरेंद्र रॉय (३६, रा. महाजननगर, सिडको) यांनी अंबड पाेलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे. भामट्याने ७ ते ८ जून दरम्यान टेलीग्राम, व्हॉटसअप, मोबाईल नंबर आणि http://ama222.work या संकेतस्थळावरून ही फसवणूक केल्याचे रॉय यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रॉय हे फार्मास्युटीकलशी संबंधित व्यवसाय करतात. याच व्यवसायाशी संबंधित काही वस्तूंच्या खरेदी विक्रीवर तुम्हाला चांगले कमिशन मिळू शकते, असे सांगून संशयिताने त्यांना गुंतवणुकीस भाग पाडले. ट्रेडींग चेन बिझनेसप्रमाणे सदस्य जोडले जातील तसे कमिशन वाढत जाईल असे आमिष त्यांना दाखविण्यात आले. रॉय यांनी १ लाख ६९ हजार रूपयांची गुंतवणूक केली. संबंधित वस्तू विकून २ लाख ७५ हजार ६०० रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु हे पैसे हवे असतील तर तुम्हाला अधिक वस्तू घ्याव्या लागतील असे त्यांना सांगण्यात आले. आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून त्यांना तक्रार अर्ज दिला. या अर्जाच्या चौकशीतून फसवणूकीचा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :