नाशिक : पावसाची उघडीप तरीही जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग कायम | पुढारी

नाशिक : पावसाची उघडीप तरीही जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मंगळवारी (दि.१९) पावसाने उघडीप दिली असली तरी धरणांमधील पाण्याचा विसर्ग कायम आहे. गंगापूरमधून ५३७ क्यूसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. दारणातून ४,३०० तर नांदुरमध्यमेश्वरमधून ७,९२४ क्यूसेक विसर्ग केला जातोय. दरम्यान, जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

संबधित बातम्या :

तीन दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यात जोरदार कमबॅक करणाऱ्या पावसाचा जोर सध्या ओसरला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याने उघडीप दिली आहे. मात्र, तीन दिवस झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्यास मदत मिळाली आहे. प्रमुख धरणांमध्ये सद्यस्थितीत ५३ हजार १५१ दलघफू उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. तूर्तास पाण्याची आवक कायम असल्याने २४ पैकी निम्म्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून ५३७ क्यूसेक वेगाने सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर इगतपुरीत पावसाचा जोर कमी झाल्याने दारणाचा विसर्ग सायंकाळी ६ वाजता ५,१०० वरून ४,३०० क्यूसेकपर्यंत खाली आणण्यात आला. याशिवाय भावलीतून २९०, वालदेवी २५, आळंदी ८७, पालखेड २१८, वाघाड २०६, चणकापूर ५१४, हरणबारी ३०५ व केळझरमधून ७५ क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या काळात पावसाचा वेग मंदावल्यास धरणांमधील विसर्गात कपात केली जाऊ शकते.

जायकवाडीला नऊ टीमएसी पाणी

गोदावरी, दारणा व पालखेड समूहातील धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी नांदुरमध्यमेश्वरमार्गे जायकवाडीकडे वेगाने झेपावते आहे. नांदुरमध्यमेश्वरमधून सध्या ७,९२४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चालूवर्षी १ जूनपासून ते आजतागायत जिल्ह्यातून नऊ हजार ५१ दलघफू म्हणजेच नऊ टीएमसीहून अधिक पाणी नांदुरमध्यमेश्वरमार्गे जायकवाडीत पाेहोचले आहे.

हेही वाचा :

Back to top button