Nashik Ganeshotsav : रिमझिम पावसात नाशिककरांनी केले लाडक्या बाप्पाचे स्वागत | पुढारी

Nashik Ganeshotsav : रिमझिम पावसात नाशिककरांनी केले लाडक्या बाप्पाचे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नभी फडकणारी भगवी पताका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण, आतषबाजी तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या घोषात मंगळवारी (दि. १९) घराेघरी व सार्वजनिक मित्रमंडळांच्या मंडपांत लाडक्या गणरायाची विधिवत प्राणतिष्ठापना करण्यात आली. चैतन्य पर्व गणेशोत्सवास प्रारंभामुळे सर्वत्र मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने आबालवृद्धांसह बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

संबधित बातम्या :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शहरातील गंगापूर राेडवरील डोंगरे वसतिगृह मैदान, सराफ बाजार परिसर, द्वारका तसेच ठक्कर डोम परिसर येथे गणेशमूर्ती घेण्यासाठी शहरवासीयांनी सहकुटुंब हजेरी लावली. त्यामुळे सकाळपासून हे परिसर गर्दीने अक्षरश: फुलले होते. शहरातील उपनगरांमध्येही गणेश प्राणप्रतिष्ठापनेची लगबग पाहायला मिळाली.नाशिककरांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत लाडक्या गणरायाचे स्वागत केले. दुपारी दीडपर्यंत मुहूर्त असल्याने घरोघरी विधिवत गणेशाची स्थापना केली.

तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे श्री गणेश रात्री उशिरा मिरवणुकीद्वारे मंडपात विराजमान झाले. यावेळी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दरम्यान, ग्रामीण भागातही गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले. यंदा जिल्ह्यात साधारणत: ८०० गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुढील 10 दिवस शहर आणि जिल्ह्यामध्ये उत्साही वातावरण असणार आहे.

हेही वाचा :

Back to top button