नाशिकमध्ये पावसाचे कमबॅक, गंगापूर धरणाच्या विसर्गात वाढ | पुढारी

नाशिकमध्ये पावसाचे कमबॅक, गंगापूर धरणाच्या विसर्गात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, धरण ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून ११०६ क्यूसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे.

संबधित बातम्या :

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून, त्यामधील साठा ५ हजार ३८६ दलघफूवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून शनिवारी (दि.१६) रात्रीपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दिवसभर ५३७ क्यूसेक वेगाने केला जात असलेला विसर्ग संध्याकाळी सातला ११०६ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. गंगापूर भरल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची समस्या सुटली आहे.

चालू वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यावर पाऊस रुसला होता. मात्र, सप्टेंबरच्या प्रारंभीपासून जिल्ह्यात पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे धरण्यांच्या पाणीपातळीत वाढ हाेण्यास मदत मिळाली आहे. चाेवीस प्रमुख धरणांमधील साठा ५२ हजार ७६३ दलघफूवर पाेहोचला असून, त्याचे प्रमाण ८० टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा ९८ टक्के म्हणजेच ६४ हजार ६४३ दलघफूवर होता. दरम्यान, सध्या पावसाची हजेरी कायम असल्याने तब्बल ११ धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास धरणांच्या विसर्गात वाढ केली जाऊ शकते.

धरण समूहसाठा (दलघफूमध्ये)

समूह साठा टक्के

गंगापूर 9181 90

दारणा 17541 93

पालखेड 7877 95

ओझरखेड 2585 81

चणकापूर 14001 61

पुनद 1232 75

धरणांचा विसर्ग (क्यूसेकमध्ये)

गंगापूर 537, दारणा 950, आळंदी ३०, पालखेड 55, वाघाड 104, भावली 73, वालदेवी 65, चणकापूर 640, हरणबारी 251, केळझर 75, नांदूरमध्यमेश्वर 500.

हेही वाचा :

Back to top button