Nashik ZP : आज, उद्या जिल्हा परिषद राहणार सुरू; दोन दिवस विशेष मोहीम | पुढारी

Nashik ZP : आज, उद्या जिल्हा परिषद राहणार सुरू; दोन दिवस विशेष मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेमध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान मोहिमेमध्ये अभिलेख वर्गीकरण आणि निंदणीकरणाची विशेष मोहीम सुरू आहे. यासाठी शनिवार आणि रविवारी असे दोन्ही दिवस जिल्हा परिषद सुरू राहणार असून, या दोन दिवसांत सर्व विभागांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये अ ब क आणि ड यामध्ये सर्व फाइल्सचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तसेच कालबाह्य झालेल्या फाइल्स या निर्लेखित करण्यात येणार आहेत. (Nashik ZP)

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्हा परिषदेत गेल्या आठवड्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख सर्व विभागांतील सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या. (Nashik ZP)

बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकीकरणामुळे प्रशासनामध्येही मोठ्या प्रमाणात बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान” राबवले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Nashik ZP)

त्याननुसार जिल्हा परिषदेमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये वर्गीकरणानुसार अ मध्ये कायमस्वरूपी आवश्यक असलेले दस्तऐवज, ब मध्ये 30 वर्षांपर्यंत ठेवावे लागणारे दस्तऐवज, क मध्ये 10 वर्षांपर्यंत आवश्यक असलेले दस्तऐवज, क १ मध्ये पाच वर्षांपर्यंत तसेच ड एक वर्षापर्यंत आवश्यक असलेले दस्तऐवज असे वर्गीकरण करण्यात येत आहे.

लिलाव करण्याबाबत विचारविनिमय

जिल्हा परिषदेच्या आवारात साधारण २० ते २२ चारचाकी शासकीय वाहने धूळखात पडलेली आहे. त्या वाहनांच्यादेखील सर्व संचिका काढून त्या वाहनांचा लिलाव करण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button