Bail Pola 2023: शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाच्या श्रृंगाराला महागाईचा साज | पुढारी

Bail Pola 2023: शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाच्या श्रृंगाराला महागाईचा साज

अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर: शेतकऱ्यांसमवेत कायम शेतात राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी बळीराजाने तयारी सुरू केली असून मोरक्या बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच साहित्याचे दर वाढल्याने पोळ्यावरही महागाईचे सावट असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असून पोळा सणाची जय्यत तयारी केली जात आहे. (Bail Pola 2023)

वषार्नुवर्षे चालत आलेला बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करून बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांसाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात राबतात. त्यामुळे बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलाची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते. यंदा बैलपोळा 14 सप्टेंबर रोजी, तर तान्हा पोळा 15 सप्टेंबरला आहे. त्यासाठी मार्केटमध्ये बैल सजावटीच्या साहित्यांनी दुकाने सजली आहेत. (Bail Pola 2023)

शुक्रवारी आठवडे बाजाराच्या दिवशी शेतकऱ्यांनी सजावटीचे साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, बैलजोडी सजवण्यासाठी लागणाऱ्या साजाच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता, मात्र पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे बैलपोळा दणक्यात साजरा करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वर्षातून एकवेळ बैलांची सेवा करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी बैलपोळ्याच्या दिवशी मिळते. त्यामुळे बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या श्रृंगाराचे दर काही प्रमाणात वाढले असले तरीही त्याची चिंता न करता बैलांना आकर्षक सजविणार आहे.

– अविनाश पाटील, शेतकरी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा काही श्रृंगाराचे दर वाढले आहेत. पावसाचे आगमन झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, बैलपोळ्यासाठी लागणारे साहित्याचे दर वाढल्याने साहित्य खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

– भालचंद्र सूर्यवंशी, शेतकरी

बैलांना सजावटीच्या साहित्यांचे दर खालीलप्रमाणे –

▪️पाठीवरचा झुला -1500 ते 4000
▪️घुंगराची चंचाळे- 1200 ते 2200
▪️बाशिंग- 100 ते 200
▪️रंगीबेरंगी गोंडे- 100 ते 1200
▪️ऑइल पेंट- 150 रुपये डब्बा
▪️पितृ शेंबी- 200 ते 500 रु.जोडले
▪️मोरक्या- 100 ते 300रुपये जोडी
▪️कंबर पट्टा 500 ते 1500
▪️पैंजण- 100 ते 300 रुपये जोडी
▪️घंटी- 150 ते 650 रुपये

हेही वाचा 

Back to top button