नाशिक : शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल बंदी, फक्त मुख्याध्यापकांचाच मोबाईल सुरू राहणार | पुढारी

नाशिक : शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल बंदी, फक्त मुख्याध्यापकांचाच मोबाईल सुरू राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाच्या वेळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी जारी केले आहेत. त्यानुसार शाळेच्या वेळेत शिक्षकांना आपले मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करावे लागणार आहेत. केवळ मुख्याध्यापकांचाच मोबाईल सुरू राहणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महापालिकेसह जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी संस्थांच्या प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना शाळेच्या आवारात, वर्गामध्ये मोबाईल फान वापरण्यावर निर्बंध घालण्यासंदर्भातील आदेश ८ सप्टेंबर २००४ व त्यानंतर १८ फेब्रुवारी २००९ मध्ये जारी केले होते. या शासन निर्णयांचा संदर्भ घेत महापालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्र्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाधिकारी पाटील यांनी जारी केला आहे.

केवळ मुख्याध्यापकांचाच मोबाईल सुरू राहणार आहे. सर्व शिक्षकांनी शालेय कामकाजाच्या वेळेत आपले मोबाईल बंद करून मुख्याध्यापकांकडे शाळा भरण्यापूर्वी जमा करावेत. अत्यावश्यक बाबींसाठी मुख्याध्यापकांच्या मोबाईलवर संपर्क करण्याबाबतच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.

मोबाईल फोनचा वापर शाळेच्या आवारात, वर्गात केवळ शैक्षणिक साधन म्हणूनच करता येणार आहे. अर्थात त्यासाठी देखील शिक्षकांना मुख्याध्यापकांची परवानगी अनिवार्य असणार आहे. मोबाईल फोनचा वापर शाळेच्या आवारात, वर्गात बाहेरील व्यक्तीशी संभाषणासाठी करता येणार नाही, असे पाटील यांनी जारी केलेल्या परिपत्रकात सूचित करण्यात आले आहे. शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांसाठी देखील हे निर्बंध लागू असणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने यापूर्वी जारी केलेल्या निर्देशांनुसार महापालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाच्या वेळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर निर्बंद घालण्यात आले आहेत. शिक्षकांनी अध्यापनाच्या वेळेत आपले फोन मुख्याध्यापकांकडे जमा करावेत.

– बी.टी.पाटील, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग. मनपा.

हेही वाचा :

Back to top button