लोकप्रतिनिधींनी उत्तरे द्यावी अन्यथा 2024 दूर नाही : युवराज संभाजीराजे यांची भुजब‌ळांवर टीका | पुढारी

लोकप्रतिनिधींनी उत्तरे द्यावी अन्यथा 2024 दूर नाही : युवराज संभाजीराजे यांची भुजब‌ळांवर टीका

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिपदे उपभोगत आहेत. मात्र येवल्यात ना शिक्षणसंस्था, ना एमआयडीसी, ना कांद्याचे प्रोसेसिंग युनिट, या प्रश्नांची उत्तरे स्थानिक लोकप्रतिनिधींनी द्यावी, नाही तर 2024 दूर नाही, अशा शब्दांत युवराज संभाजीराजे यांनी येथील शेतकरी संघर्ष सभेत थेट छगन भुजबळ यांना आव्हान दिले.

स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर होते. सोमवारी दिवसभर येवला मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर लासलगावमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे यांनी यावेळी अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, सध्याच्या राजकारणाला सामान्य माणूस कंटाळला आहे. कोणीही महाराष्ट्राचा आदर्श घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू असून, राजकारणावर बोलण्यास कंटाळा यायला लागला आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे काय सुरू आहे, याचे कुणालाच सोयरसुतक नाही. त्यामुळे आता राजकारणाविषयी बोलायचे नाही.

भुजबळ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, येथील मंत्री महोदय सरकारमध्ये आहेत. कांद्याचे जाहीर केलेले अनुदान कधी देणार? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित करत नाफेडने कांदा खरेदीत अनेक अटी लादल्या आहेत. चांगला कांदा खरेदी करतात. मग दुसरा कांदा कोणी खरेदी करायचा? लासलगावमध्ये कांद्याची एवढी मोठी बाजारपेठ असताना कांद्याचे प्रोसेसिंग युनिट का नाही? नुकताच पाऊस पडला, कांदालागवड सुरू झाली. पण पुन्हा पाऊस नाही पडला, तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे का? असे सवाल केले. येवल्यात रस्त्यांची अवस्था वाईट आहे. एमआयडीसी बघण्यासाठी गेलो, तर एमआयडीसी सापडलीच नाही. इथे जवळपास 350 एकर जागा पडून आहे. येवल्यात एमआयडीसी का सुरू होऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी केला.

मग पवारांनी प्रश्न का विचारले नाहीत?

काही दिवसांपूर्वी शरद पवार येवल्यात आले होते. मात्र त्यांनी विकासाबाबत एकही प्रश्न विचारला नाही. पवार त्यांचे गुरू आहेत. येवला मतदारसंघात इतक्या वर्षांपासून भुजबळ आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित असताना पवारांनी त्यांना विचारणा करायला हवी होती, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी टीका केली.

हेही वाचा :

Back to top button