पुणे : पीएमपी प्रशासनाची हिटलरशाही? चालक-वाहकांना महिन्याला एकच रजा | पुढारी

पुणे : पीएमपी प्रशासनाची हिटलरशाही? चालक-वाहकांना महिन्याला एकच रजा

पुणे : पीएमपीला दररोज अडीच कोटींचे उत्पन्न मिळवायचे आहे. त्याकरिता पीएमपीकडील कायम, बदली व हंगामी चालक-वाहकांना महिन्यातून फक्त एकच दिवस रजा मंजूर केली जाईल, अशा आशयाचे पत्र न. ता. वाडी आगारामध्ये लावण्यात आले आहे. सुट्यांमध्ये होणार्‍या कपातीमुळे चालक-वाहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, पीएमपी प्रशासनाने अशाप्रकारे हिटलरशाही का सुरू केली आहे? असा सवाल पीएमपीवर्तुळातून विचारला जात आहे.

पीएमपीच्या न. ता. वाडी आगारात 5 सप्टेंबरला सहायक डेपो मॅनेजर यांच्या सहीने हे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यात प्रतिदिनी अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यास अनुसरून चालक-वाहकांना सप्टेंबर 2023 पासून प्रतिमहा केवळ एकच रजा मंजूर केली जाईल, असे नमूद केले आहे. त्यामुळे पीएमपी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

असे कोणतेही पत्रक प्रशासनाकडून काढण्यात आलेले नाही. डेपो मॅनेजरला कोणतेही पत्रक काढण्याची अनुमती नाही. असे पत्रक डेपो मॅनेजरने कसे काय काढले? याची माहिती घेऊन त्यासंदर्भात चौकशी केली जाईल.

– सतीश गव्हाणे,
मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

परिपत्रक बेकायदा आहे. अशा निर्णयाने चालक-वाहकांचे मानसिक संतुलन बिघडू शकते. हिटलरशाहीमुळे कामगार घाबरून आजारी असतानादेखील कामावर येत आहेत. त्यातच या पत्रकामुळे धडकी भरली आहे. असा जुलमी कारभार प्रशासनाने थांबवावा आणि पत्रक रद्द करावे.

– दत्तात्रय नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल

राष्ट्रवादी म. कामगार युनियन सहायक डेपो मॅनेजर संतोष किरवे यांनी काढलेले पत्र प्रशासकीय परिपत्रक नाही. चालक-वाहक सातत्याने रजा घेत असल्यामुळे सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे किरवे यांनी सांगितले आहे. चालक-वाहकांना सुट्या मिळत राहतील.

– सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

हेही वाचा

बबन घोलप यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला, पुन्हा दोन दिवसानंतर चर्चा होणार

७५ हजार पदांसाठी राज्यात कंत्राटी मेगाभरती; सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांना नोकर भरतीचे कंत्राट

कोल्हापूर : बालिंगा दरोड्यातील टोळीच्या म्होरक्याला इंदूरमध्ये बेड्या

Back to top button