

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजरी लावल्याने बऱ्याच ठिकाणी करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाल्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यात या पावसामुळे प्रथमच नदी-नाले खळखळून प्रवाहित होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच तालुक्याचा पश्चिम भाग वगळता इतरत्र फक्त रिमझिम पाऊस झाला होता. त्यामुळे विहिरींनी कधीच तळ गाठला होता. मात्र, सध्या पडणाऱ्या पावसामुळे विहिरींना पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे.
दिंडोरीच्या पश्चिम भागातील ननाशी, कोशिंबे मंडळामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे वाघाड धरण १०० टक्के भरले असून, सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या प्रश्न मिटल्यामुळे परिसरातील वाघाड धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. तर करंजवण धरणाच्या पाणलोट क्षेत्रातच्या पश्चिम परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसात असल्यामुळे करंजवण धरणातील पाणीसाठा ६८ टक्क्यांवरून ८८ टक्के इतका झाला असून, पुन्हा पावसाने साथ दिल्यास करंजवण धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे हे सर्व पाणी पुणेगाव धरणात येत असल्यामुळे पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पुणेगाव धरणातून उनंदा नदीत पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे ओझरखेड धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन पाणीसाठा 86 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कादवा, कोलवण नदीसह छोट्या-मोठ्या नाल्याचे पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात ६००० हजार क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला होता. मात्र, रात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे सध्या या धरणातून ४१८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आत्तापर्यंत कोरड्या असलेल्या तिसगाव धरणात पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा ३० टक्के इतका झाल्यामुळे पाणी योजना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर दोन दिवस असाच राहिल्यास तालुक्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली असून दिंडोरी तालुक्यासह चांदवड, येवला, मनमाड, निफाड तालुक्यांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा
करंजवण 88 %
पालखेड 97 %
पुणेगाव 94 %
वाघाड 100 %
ओझरखेड 86 %
तिसगाव 30 %
हेही वाचा :