सेवा शुल्काच्या नावाखाली खवय्यांची लूट | पुढारी

सेवा शुल्काच्या नावाखाली खवय्यांची लूट

महेंद्र कांबळे / शंकर कवडे

पुणे : हॉटेलमध्ये जाऊन वादावादी न होता शांतपणे अन्नाचा आस्वाद घेता यावा, यासाठी अनेक जण चांगल्या हॉटेलमध्ये जातात. मात्र, इथेच खरी लूट होत असल्याचा प्रकार उच्चशिक्षित तरुणाने समोर आणला आहे. सेवाशुल्काच्या नावाखाली आकारलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याची विनंती केल्यावरही उलट पैसे भरण्यास भाग पाडले. यानंतर त्या तरुणाने असाच प्रकार अन्य हॉटेलात होतो का ? याची शहानिशा केली असता, सर्वत्र अशाच प्रकारची लूट होत असल्याचे समजल्यावर त्याने संबंधित हॉटेलचालकास नोटीस बजावून इतरांना जागरूक करण्याचे काम केले आहे.
…असा घडला प्रकार 
पुण्यातील एक उच्चशिक्षित तरुण आपल्या मित्रपरिवारासह सेनापती बापट रस्त्यावरील एका नामांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. ग्राहकाने खाद्यपदार्थ मागवले होते. जेवण झाल्यानंतर ग्राहकाला 2 हजार 306 रुपयांचे बिल देण्यात आले. त्याने बिल तपासले असता खाद्यपदार्थाचे बिल 2 हजार 5 रुपये झाले असताना हॉटेलने त्यांच्याकडून या बिलावर 2.5 टक्के केंद्रीय जीएसटी आणि 2.5 टक्के राज्याचा जीएसटी आकारला (50 रुपये). हे दोन्ही कर आकारले असताना त्याने सर्व्हिस चार्जच्या नावाखाली एकूण बिलावर 10 टक्के सर्व्हिस चार्ज (200 रुपये) आकारल्याचे दिसले.
हा चुकीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याने हॉटेल व्यवस्थापनाला याची विचारणा केली. तसेच हा सर्व्हिस चार्ज भरणे न भरणे हे ऐच्छिक असल्याचे सांगितले. परंतु, हॉटेलने ग्राहकाचे काहीही न ऐकता त्याला सरकारी कायदे रेस्टॉरन्टसारख्या खासगी संस्थेला लागू होत नसल्याचे उत्तर दिले. तसेच ग्राहकाला संपूर्ण रक्कम भरण्यास भाग पाडले. मात्र, या चुकीच्या प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी संबंधित जागरूक ग्राहकाने अ‍ॅड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस बजावली आहे. चुकीच्या व्यापार पद्धतीबद्दल ग्राहकाने हॉटेल विरोधात दिवाणी, फौजदारी तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.  ग्राहक संरक्षण कायदा 2019 चा अवमान झाल्याने संबंधित हॉटेलला याबाबत नोटीस बजावली आहे.
सेवा शुल्क हे ऐच्छिक आहे, ते देणे बंधनकारक नाही. 
                                       – महेंद्र पितळिया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ. 
ग्राहकांनी हॉटेल चालकांना सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक नाही. आपण सर्व्हिस चार्ज घेत आहोत हे संबंधित हॉटेलने ग्राहकाला सांगणे गरजेचे आहे. जर ग्राहक सर्व्हिस चार्ज देण्यास नकार देत असेल तर त्याला ते बिल दुरुस्त करून देणेही हॉटेलचालकांवर बंधनकारक आहे. 
                                               – गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन.
खवय्यांकडून सेवा शुल्काच्या नावाखाली तसेच इतर खर्चाच्या नावाखाली जीएसटी भरूनदेखील पैसे उकळणे अत्यंत चुकीचे आहे. ग्राहकांनी जागरुक राहून बिलातून हा सेवा शुल्क व इतर खर्च वगळण्यासाठी व दुरुस्तीसाठी आग्रह धरला पाहिजे. 
                                                             – विवेक वेलणकर,  सजग नागरिक मंच. 
कोणत्याही हॉटेलला किंवा रेस्टॉरन्टला बिलामध्ये आपोआप सेवा शुल्क जोडता येत नाही. ग्राहकांकडून अन्य कोणत्याही नावाखाली त्यांना सेवा शुल्क आकारता येत नाही. तसेच ग्राहकाला जबरदस्तीने सेवा शुल्क भरण्यास भाग पाडता येत नाही. सेवा शुल्क ऐच्छिक असून, ग्राहकाच्या विवेकबुध्दीनुसार असल्याचे सीसीपीएच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केले आहे.
                                                                           – अ‍ॅड. निखिल कुलकर्णी
आयोगात तक्रार करा
हॉटेल किंवा रेस्टॉरन्ट यांना आपोआप बिलामध्ये सर्व्हिस चार्ज अंतर्भूत करता येत नाही. ग्राहकांकडून इतर नावाखाली सर्व्हिस चार्ज आकारता येत नाही. सेवा शुल्कासाठी दबाब टाकता येत नाही. सेवा शुल्क हा ऐच्छिक असून, ग्राहकाला कल्पना देणे गरजेचे आहे. याचा भंग झाल्यास नॅशनल कन्झुमर हेल्पलाइनला (1915) तक्रार करता येते. त्याबरोबरच ग्राहक आयोगात तक्रार दाखल करता येते. सीसीपीएलादेखील तक्रार करता येते.
हेही वाचा  :

Back to top button