पुढारी ऑनलाईन डेस्क : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तेलगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज ( दि. १०) विजयवाडा लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्यायालयाने (एसीबी) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज ( दि. ११ ) तेलगू देसम पार्टीचे कार्यकर्ते आंध्र प्रदेशमध्ये रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी जाळपोळ तर काही ठिकाणी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. (TDP workers protest )
पश्चिम गोदावरी आणि तिरुपतीमध्ये टीडीपी कार्यकर्त्यांनी आज सकाळी निदर्शने केली. तर चित्तूरमध्ये दुचाकी वाहनांची जाळपोळ आणि बसवर दगडफेक करण्याच्या घटना घडल्याने तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
आंध्र प्रदेश राज्यात २०१४ मध्ये बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळ (APSSDC) स्थापन करण्यात आले होते. तत्कालिन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. या महामंडळातमध्ये ३७१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप नायडू यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश सीआयडीने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदाही दाखल केला होता.