Nandurbar Police : पोलीस दादाहा सेतू, नंदुरबार पोलिस दलाचा अभिनव उपक्रम | पुढारी

Nandurbar Police : पोलीस दादाहा सेतू, नंदुरबार पोलिस दलाचा अभिनव उपक्रम

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

पोलीस व जनता या दोघांमध्ये योग्य समन्वय ठेवणे, तसेच आदिवासी बांधवांना आवश्यक असणारे कागदपत्र, प्रमाणपत्रे काढणे तसेच ते कागदपत्र काढण्यासाठी मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे “पोलीस दादाहा सेतू” या अभिनव समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ केला जात आहे. (Nandurbar Police)

अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांच्या उपस्थितीत उद्या दि.( 10)  सकाळी 12 वाजता या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (Nandurbar Police )

नंदुरबार जिल्हा पोलीस दल (Nandurbar Police)  हे नेहमी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलीस व जनता संबंध वृद्धीगत व्हावे यासाठी देखील नेहमीच प्रयत्नशिल असतात. ऑपरेशन अक्षता, अंमली पदार्थ मुक्त जिल्हा, पाणपोई, जनता दरबार, श्रमदान या सारखे नव-नवीन उपक्रम राबवित असते. “पोलीस दादाहा सेतू” उपक्रम त्यापैकीच एक आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, स्थानिक बोली भाषेत पोलीस दादाहा सेतू म्हणजे पोलीस दादाचा सेतू. या ठिकाणी नागरिकांचे शासकीय काम पोलीस दलामार्फत शासकीय कार्यालयात पोहचवून झालेली कामे, दाखले, प्रमाणपत्रे इत्यादी नागरिकांना परत मिळणार आहेत. म्हणजेच पोलीस दल हे नागरिक व शासकीय कार्यालये यामध्ये सेतू / पुलाची भूमिका पार पाडणार आहेत. या संकल्पनेतून या योजनेस पोलीस दादाहा सेतू असे नामकरण केले आहे.

विविध शासकीय योजनांचे लाभ किंवा शासकीय योजनांची माहिती तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे निश्चित केले. यामध्ये आदिवासी बांधवांच्या पैशांची बचत व वेळेचा होणारा अपव्यय वाचणार आहे. तसेच सर्व कामे विनामुल्य होणार आहेत. पोलीस दादाहा सेतू या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्या कक्षामार्फत संबंधीतांना योग्य ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येईल..

हेही वाचा :

Back to top button