

दिंडोरी(नाशिक), पुढारी वृत्तसेवा : ननाशी वनपरिक्षेत्र (प्रा) चे हद्दीत मौजे वडबारी हरणगाव शिवारात ६सप्टेंबर रात्रीचे सुमारास वनविभागामार्फत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अखेर जेरबंद झाला. गत महिन्यात २७ ऑगस्टला याच शिवारात बिबट्याने गुरे चारण्यासाठी गेलेल्या रवींद्र वामन गावित याच्यावर हल्ला करून जागीच ठार केले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्रगस्ती करत असलेल्या वनकर्मचाऱ्यांना बिबट्याच्या पिंजऱ्याचा आवाज आल्याचे तेथील जवळ राहणारे इसमानी ही माहिती दिली असता वनकर्मचारी यांनी खात्री करून वन अधिकारी यांना कळविले. त्यानंतर तत्काळ वनविभागाचा पथकाने सदर ठिकाणी दाखल झाल्यावर स्थानिक गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ, वन परिक्षेत्र अधिकारी सविता पाटील, वनपाल रुपेश दुसाने, जगदीश अमलुक, युवराज गवळी, वनरक्षक तुषार तोरवणे, हिरामण चौधरी, गणेश अहिरे, सुनील गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, मनोज गावंडे, गणेश गणोरे, जगदीश चौधरी, आदी कर्मचारी व ग्रामस्थ यांनी मिळून बिबट्याला तेथून सुरक्षित रित्या हलवून नासिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये रात्री आणले.
सदर कार्यवाही उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक . पंकज गर्ग , सहाय्यक वनसंरक्षक पश्चिम नाशिक अनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील आदेशानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
-हेही वाचा