गिरीश महाजन यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्टचे प्रकरण चिघळले | पुढारी

गिरीश महाजन यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्टचे प्रकरण चिघळले

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात बदनामीकारक पोस्ट केल्याचे प्रकरणात लोकसंग्राम पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढण्याची चिन्ह तयार झाले आहे. पालकमंत्री महाजन यांच्या संदर्भात बदनामीकारक पोस्ट केल्याने माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचे समर्थक असणाऱ्या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर भावना दुखावल्याने जमावाने डॉक्टरच्या गाडीची तोडफोड केली आहे. या प्रकरणात अज्ञात सात जणांविरोधात दंगल आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्याचे माजी आमदार तथा लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष अनिल गोटे आणि धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात अनेक वेळेस शाब्दिक वाद रंगले आहेत .गोटे आणि मंत्री महाजन यांच्यात विळा भोपळ्याचे वैर असून आता हा वाद पुन्हा वाढण्याची चिन्ह तयार झाले आहे. त्याला फेसबुकची एक पोस्ट कारणीभूत असून फेसबुकची पोस्ट करणारा व्यक्ती हे व्यवसायाने डॉक्टर असून ते माजी आमदार अनिल गोटे यांचे समर्थक आहेत.

धुळ्यातील डॉक्टर संजय पिंगळे यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट आढळून आली. यात धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात वादग्रस्त शब्द वापरले गेल्याची बाब भारतीय जनता पार्टीचे माजी मंडळ अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून डॉक्टर पिंगळे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धुळे शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम ५००, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र या घटनेनंतर रात्री हे प्रकरण चिघळले आहे. रात्री डॉक्टर पिंगळे यांच्या गाडीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली असून ही तोडफोड करणारे भारतीय जनता पार्टी समर्थक कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात नीता संजय पिंगळे यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

धुळ्यातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचे समर्थक असणारे डॉ. संजय पिंगळे यांचे निवासस्थान आहे. रात्री अज्ञात सात जणांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली असून डॉक्टर पिंगळे यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांची पत्नी नीता पिंगळे यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीत त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. रात्री विद्युत पुरवठा खंडित झालेला असताना त्यांच्या घराजवळ लावण्यात आलेली एम एच 18 बी एक्स 17 28 क्रमांकाची कारची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांना या संतप्त जमावाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात डॉक्टर पिंगळे यांनी पोस्ट केल्याचा आरोप करीत या जमावाने तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार अज्ञात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button