पुढारी ऑनलाईन डेस्क : शुक्रजंतू, स्त्रीबीज आणि गर्भाशय यांच्याशिवाय भ्रूण बनवण्यात संशोधकांना यश आलेले आहे. प्रयोगशाळेत वाढवलेल्या स्टेमसेल्सच्या मदतीने हे भ्रूण बनवण्यात आले आहे, अशी माहिती इस्राइलमधील वाईजमॅन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. जेकब हान यांनी दिली आहे. हे भ्रूण प्रयोगशाळेत १४ दिवसांपर्यंत वाढवता आले आहे. Embryos without sperm or egg
गर्भपात का होतो, जन्मापासून असणारे व्यंग, वंध्यत्व यावर नवा प्रकाश टाकण्याचे काम हे संशोधन करू शकेल, असा आत्मविश्वास संशोधकांना आहे. संशोधकांनी या भ्रूणाला मानवी भ्रूण म्हणण्यास नकार दिला आहे. हे मानवी भ्रूणाचे सर्वांत जवळपास जाणारे मॉडेल आहे, असे त्यांनी म्हटले आहे. रसायनिक बदल करून हे भ्रूण बनवण्यात आले आहे. Embryos without sperm or egg
या भ्रूणात ऊतींची सुरुवातीची वाढ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पेशींची निर्मिती करण्याची क्षमता आहे.
यूके युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंगमधील स्टेम सेलचे तज्ज्ञ डॅरियस विडेरा म्हणाले, "नैसर्गिक भ्रूण जसे असते, त्याच्या जवळपास पोहोचतील असे भ्रूण आता बनवता येऊ लागले आहेत. पण यावर कायदेशीर नियंत्रणाचीही गरज आता निर्माण होणार आहे."
पण हे भ्रूण चौदा दिवसांनंतर मानवी गर्भात वाढवण्यासाठीचे प्रयत्न या संस्थेने केलेले नाहीत, ही बाब महत्त्वाची आहे असे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.
हेही वाचा