लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव व परिसरात पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लासलगाव येथील शेतकरी उमेश बाळासाहेब पाटील यांचे १० एकर सोयाबीन पावसाअभावी जळून गेले आहे. बियाणे, खते, पेरणी असा जवळपास लाख रुपयांचा खर्च वाया गेला आहे. असेच विदारक चित्र संपूर्ण तालुक्यात दिसत आहे.
यंदा पाऊसच नसल्याने शेत जमिनीतील ओल जवळपास गायब झाली आहे. त्यातच तापमान वाढत असल्याने खरिपाचे पीक कोमेजून जात आहे. तालुक्यात या वर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे पीक उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. मका व सोयाबीन ही पिके फलधारणा व फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्याने सध्या पाण्याची आवश्यकता आहे. परंतु या वर्षी तालुक्यात एकदाही दमदार पाऊस झाला नाही. भुरभुर व हलक्या स्वरूपाचा पावसानेदेखील मागील महिन्यापासून उघडीप दिल्याने खरिपाची पिके माना टाकीत आहेत.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागलेल्या आहेत. पिकांना पाणी देताना वीजपुरवठा कमी अधिक दाबाने होत असल्याने वीजपंपात बिघाड किंवा वीजपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज पंप दुरुस्तीचा खर्च आणि शेतीकामाचा खोळंबा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
दुष्काळाच्या मदतीसाठी शेतकऱ्यांचा रेटा
पावसाअभावी तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पिवळीफटक पडली आहेत. मागील गेल्या दोन महिन्यापासून खरीप पिकाची लागवड झाल्यानंतर एकदाही दमदार पाऊस तालुक्यात पडला नाही. तालुक्यातील विहिरीनी तळ गाठला आहे. तर नद्या, नाले, कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :