जालना : पुढारी वृत्तसेवा; संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे पुरावे, दस्तऐवज आमच्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रे सरकारला देण्यास आपण तयार आहोत. सरकारने राज्यपालांची परवानगी घेऊन एका दिवसात वटहुकूम, (जी.आर.) काढावा, अशी मागणी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत केली.
जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा बुधवारी नववा दिवस होता. सरकारला अध्यादेश काढायचा असेल, तर त्यासंदर्भातील जी कागदपत्रे हवी आहेत, पुरावे हवे आहेत, ते सर्व पुरावे उपलब्ध आहेत. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळावीत, अशी मुख्य मागणी आहे. त्यासाठीची कागदपत्रे धुंडाळण्यात वेळ घालवू नका. रिक्षा, टिप्पर भरून कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती घेऊन जावीत. सरकारी यंत्रणेचाही वेळ वाचेल, असे जरांगे-पाटील म्हणाले.
ते म्हणाले, या पुराव्यांच्या आधारे एका दिवसात जी.आर., अध्यादेश काढता येईल; परिणामी शासनाने नेमलेल्या समितीचाही वेळ वाया जाणार नाही. समिती जेथून कागदपत्रे आणणार आहे, तेथूनच आम्ही कागदपत्रे आणली आहेत, असे सांगून जरांगे-पाटील म्हणाले, हैदराबाद येथून आम्ही काही पुरावे आणलेआहेत. त्याचा समितीने अभ्यास करावा. आता विधानसभा अधिवेशन नसले, तरी राज्यपालांची परवानगी घेत वटहुकूम काढावा. त्यात कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. तसेच या कामासाठी तज्ज्ञांची गरज असेल तर ती व्यवस्थाही करू.
आमचे आंदोलन राजकीय नाही. कोणी त्यावर वेगळी टीका केली तर ते सहन करणार नाही, असा इशारा देऊन जरांगे-पाटील म्हणाले, ओबीसी यादीत आम्ही 83 व्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे ओबीसी आणि मराठा असा संघर्ष नको. मराठा, ओबीसी हे एकजीव आहेत, हे लक्षात घ्या, आपल्याला एकमेकांच्या अंगावर सोडण्याचे काम सुरू आहे. आपण चिखलफेक केली, तर ते परवडणारे नाही, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली असून, त्यांना बुधवारी सलाईन लावण्यात आले. दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे उपोषणस्थळी आले होते. बुधवारी सकाळी जरांगे-पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट घेतली.