लासलगाव (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिन्यात टोमॅटो उत्पादकांची करोडपती, लखपतींची मोठमोठी होर्डिंग्ज लावणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांवर रुसला आहे. ऑगस्टमध्ये सरासरी २६०० रुपये प्रतिक्रेट दराने विकला गेलेला टॉमेटो सध्या १०० रुपये प्रतिक्रेटवर आल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टॉमेटो रस्त्यावर फेकून रोष व्यक्त केले. सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या महिन्यापर्यंत अनेक शेतकऱ्यांना करोडपती-लखपती केलेल्या टोमॅटोने आता रडविण्यास सुरुवात केली आहे. भाव वाढताच केंद्र सरकारने तत्परतेने टोमॅटो आयात करत भावात घसरण थांबवली. परंतु स्थानिक बाजारपेठेत भावात दिवसेंदिवस घसरण होत असून, लासलगाव बाजार समितीच्या आवारात बुधवारी टोमॅटोला किलोला अक्षरशः २ ते ५ रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकत रोष व्यक्त केला.
वीस किलोच्या क्रेटला अवघा ५० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र, मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या भावात घसरण होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चदेखील निघणे मुश्किल झाल्याने गांजाच्या शेतीची परवानगी देण्याची मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी करत आहेत.
येथील बाजार समितीत ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी टोमॅटोस प्रतिक्रेट २६०० रुपयांचा दर मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादकांना वाढत्या दराचा काहीअंशी फायदा मिळाला. लासलगाव बाजार समितीत टोमॅटोचे दर सप्टेंबर महिन्यात अक्षरशः ३० ते १४० रुपये प्रतिक्रेट झाल्याने उत्पादक चिंतेत आहेत. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक उभे केले, परंतु सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
हेही वाचा :