मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, आमदार बच्चू कडू यांची मागणी | पुढारी

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, आमदार बच्चू कडू यांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठा मुलुख असल्याने कागदपत्रांवर मराठा असा जातीचा उल्लेख केला. पण, मराठा हे कुणबी असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाढवून देतानाच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जबाबदारी सरकारचीच असल्याचे कडू म्हणाले.

नाशिकमध्ये मंगळवारी (दि.५) दिव्यांगाच्या दारी अभियान पार पडले. आ. कडू यांची अभियानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दाेन ते तीन समाज आरक्षणासाठी आग्रही आहेत. कुणबींना ओबीसीचे प्रमाणपत्र दिले जाते. मुळातच विदर्भातील सगळे मराठा हे ओबीसीमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ७५ टक्के मराठा हे ओबीसी आहेत. फक्त आठ जिल्ह्यांचा विरोध का हे मला कळत नसल्याचे सांगत आरक्षणावर एक शासन निर्णय काढायला काय हरकत आहे, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.

नोकरी हा विषय सोडला, तर आरक्षणाची गरज काय? परंतु, सध्या नोकरी हे पैसेवाल्यांची झाल्याने आरक्षणाला महत्त्व आहे. एकदा आमदार झाला किंवा नोकरी मिळाली, की मरेपर्यंत व्यवस्था होते. दुष्काळाची झळ कधी अधिकारी व आमदारांना लागली का? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. दुष्काळावर दरवेळी मदतीपेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी सूचना त्यांनी केली.

मुंडे यांनी क्षमता ओळखावी

पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेवर बोलताना कडू यांनी त्यांच्यात क्षमता असून, मनावर घेतल्यास त्या काहीही करू शकतात. मुंडे यांनी स्वत:ची क्षमता तपासावी, असा सल्ला कडू यांनी दिला. राज्यात तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले. विजय वडेवट्टीवार यांची काय गॅरंटी आहे, पाच वर्षांत जे पक्षांतर झाले, ते मागच्या ५० वर्षांत झालं नाही, असे कडू म्हणाले. आ. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांना असं वाटत की माफी नाही मागितली पाहिजे. महाराष्ट्र भडकू दिला पाहिजे होता का? असा संतप्त सवाल कडू यांनी उपस्थित केला.

हेही वाचा ;

Back to top button