नाशिक : उंचावरून पडल्याने दोघा कामगारांचा मृत्यू | पुढारी

नाशिक : उंचावरून पडल्याने दोघा कामगारांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बांधकाम मजूर व ठेकेदाराचा उंचावरून पडल्याने मृत्यू झाल्याच्या घटना सोमवारी (दि.४) घडल्या. या प्रकरणी अंबड व सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनांनी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशोकस्तंभ येथील वात्सल्य महिला आश्रमाच्या टेरेसवरील पत्र्याचे शेड दुरुस्तीचे काम करीत असताना तोल जाऊन पडल्याने ३६ वर्षीय ठेकेदाराचा सोमवारी सायंकाळी ४.५० च्या सुमारास मृत्यू झाला. पंकज रमेश वाघमारे (३६, रा. महात्मा फुले शासकीय वसाहत, टिळकवाडी, शरणपूर रोड) असे मृताचे नाव आहे. अशोकस्तंभ परिसरात वात्सल्य महिला आश्रम असून, या आश्रमाच्या तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड आहे. या शेडच्या दुरुस्तीचे काम वाघमारे करीत होते. सोमवारी (दि.४) काम करीत असताना वाघमारे यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत सावतानगर येथे बांधकाम व्यावसायिक प्रकाश अमृतकर यांच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कामावर असलेला बांधकाम कामगार राजनारायण राय (३६ रा. जगतापवाडी, सातपूर) हा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. गंभीर दुखापतीमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने, राय याचा भाऊ संजीवकुमार यादव याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button