अंटार्क्टिकामध्ये वैज्ञानिकांच्या भाषा वेगवेगळ्या; उच्चार एकसारखेच!

अंटार्क्टिकामध्ये वैज्ञानिकांच्या भाषा वेगवेगळ्या; उच्चार एकसारखेच!

वॉशिंग्टन : अंटार्क्टिकामध्ये वैज्ञानिकांमध्ये होणार्‍या संवादामधून एका नव्या भाषा शैलीचा छडा लागला आहे. याठिकाणी संशोधनासाठी राहणारे वैज्ञानिक इंग्रजी, हिंदी, फे्ंरच आणि जगभरातील सुमारे 7100 भाषांपेक्षा वेगळ्या अशा एका नव्याच एक्सेंटमध्ये बातचित करतात. त्याला आता 'अंटार्क्टिका एक्सेंट' म्हटले जात आहे.

अंटार्क्टिकामध्ये सुमारे 4 हजार लोक राहतात. याठिकाणी तापमान उणे 98 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे तिथे वर्षातील काही काळ केवळ एक हजारच्या आसपासच लोक राहतात. अर्थात ते कोणत्या एकाच देशाचे नसतात तर वेगवेगळ्या देशांमधून आलेले वैज्ञानिक असतात. अंटार्क्टिका कोणत्या एका देशाच्या मालकीचा नसून हा खंड म्हणजे संपूर्ण जगाची सामूहिक संपत्ती आहे.

नव्या एक्सेंटचा छडा लावण्यासाठी या एक हजार संशोधकांपैकी अकरा जणांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यापैकी 8 ब्रिटिश, एक अमेरिकन, एक जर्मन आणि एक आयरिश संशोधक होते. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या, मात्र त्यांची बोलण्याची शैली, उच्चार एकमेकांमध्ये मिसळलेले, एकसारखे बनलेले होते. त्यापैकी अनेक शब्द आणि ते बोलण्याची पद्धत एकसारखीच होती. त्यालाच आता 'अंटार्क्टिका एक्सेंट' असे नाव देण्यात आले आहे.

हे संशोधक वॉवल्स म्हणजेच स्वरांचा उच्चार दीर्घ करीत आहेत असे दिसून आले होते. उदा. फ्लो आणि डिस्कोसारख्या शब्दांमध्ये येणार्‍या 'ओ'चे उच्चारण ते घशाऐवजी तोंडाने करीत होते. संशोधक जॉनथन हॅरिंग्टन यांनी सांगितले की उच्चारणातील बदल ओळखणे कठीण होते; पण त्यांना मोजले जाऊ शकत होते. यावरून असे दिसून येते की ज्यावेळी वेगवेगळ्या देशांमधील लोक जगापासून दूर एखाद्या ठिकाणी एकत्र राहत असतील तर नवा एक्सेंट विकसित होण्याची शक्यता वाढते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news