शिक्षक दिन विशेष : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अधीक्षक झाले शिक्षक | पुढारी

शिक्षक दिन विशेष : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अधीक्षक झाले शिक्षक

नाशिक : नितीन रणशूर

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान असते. मात्र, त्यासाठी पेशाने शिक्षकच असणे गरजेचे नसते. विद्यार्थी घडविण्याची तळमळ असल्यास अधीक्षकही उत्तम शिक्षक होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिरगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील आदिवासी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक अरुण बागले. ते अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिवसरात्र काम करत आहेत.

दहा वर्षांपूर्वी उच्च शिक्षित अरुण बागले हे आदिवासी विकास विभागात अधीक्षक पदावर ठाणापाडा (त्र्यंबकेश्वर) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत रुजू झाले होते. मात्र, त्यांच्यातील शिक्षक स्वस्थ बसून देत नव्हता. अखेर त्यांनी अधीक्षक पदासह शिक्षकाची दुहेरी जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारत आश्रमशाळेत विविध उपक्रम सुरू केले. शाळेत बिरसा, फुले, शाहू, आंबेडकर पथनाट्य पथकाची स्थापना केली. या पथकाच्या माध्यमातून दुर्गम-अतिदुर्गम भागातील गाव-पाड्यांवर जाऊन सामाजिक विषयांवर प्रबोधन केले.

खेळात प्रावीण्य मिळाल्यास शासकीय व निमशासकीय विभागात नोकरीचे द्वार खुले होत असल्याचे हेरून बागले यांनी खेळाडू घडविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली. आतापर्यंत बागले यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके पटकाविले आहे, तर ओडिशा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्वअध्ययन संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ३० गट तयार करून वाचन, लेखन, व्यक्तिमत्त्व विकास यावर लक्ष केंद्रित केले.

दरम्यान, बागले यांनी २० विद्यार्थिनी व २० विद्यार्थी तसेच पाच शिक्षक व कर्मचारी अशा ४५ जणांना हवाई सफर घडवत शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि मुंबईतील शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन माहिती संकलित केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विपश्यनेतून विज्ञानाकडे’ या संकल्पेवर आधारित १५ ते १९ वयोगटातील ४५ विद्यार्थ्यांनी इगतपुरीच्या आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रात ७ दिवसांचे शिबिर पूर्ण केले.

‘रविवार माझा हक्काचा’ उपक्रम

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘रविवार माझा हक्काचा’ हा उपक्रम अधीक्षक बागले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जातो. दर रविवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते. तर ‘एक पाऊल विद्यार्थ्यांच्या विकासासाठी’ या उपक्रमांर्तगत विद्यार्थ्यांना नाशिकसह पुणे आणि मुंबई येथे शिक्षणासाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येते.

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विविध गुण उपजत असतात. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना यशाचे शिखर गाठणे सहज शक्य आहे. त्यामुळेच या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहयोगी कर्मचारी आणि पत्नी पूनमची विशेष सा‌थ मिळत आहे.

-अरुण बागले, उपक्रमशील अधीक्षक आदिवासी विकास विभाग

हेही वाचा :

Back to top button