नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ कांद्याला शुक्रवारी (दि.१) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडपेक्षाही जादा दर मिळाला. नाफेडच्या कांदा खरेदीच्या जाचक अटींपेक्षा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याला समाधानकारक भाव व तत्काळ पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडेच आहे.
गुरुवारी (दि. १) नाफेडने ठरलेल्या दरापेक्षा 125 रुपये प्रतिक्विंटलने कमी दराने कांदा खरेदी केल्याच्या बातम्या येताच नाफेडने पुन्हा कांदादर जैसे थे करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नाफेडने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत शहरी भागांत न पाठवता याची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. फार्मर प्रोडुसर कंपन्यांनी खरेदी केलेला कांदा साठवणुकीसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे.
भविष्यात कांद्याचे बाजार आणखी वाढू शकतील, या हेतूने शेतकरीवर्ग गरजेनुसार कांदा विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणत आहे. केंद्र सरकारकडून कांद्यावरती आणखी कुठलेही निर्बंध लादू नये, अशी भावना शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. कांद्यावर लावलेले 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात यावे तसेच कांदा पुरवठा करण्यासाठी किसान रेल्वेची सुविधा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
भारताने कांद्यावर निर्यात ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर पाकिस्तान सरकारनेदेखील कांद्यावरील किमान निर्यात शुल्क १६५ डॉलवरून २२० डॉलर प्रतिमेट्रिक टन केले आहे. पाकिस्तानमध्येही किरकोळ बाजारात कांदा महाग होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी निर्यात मूल्यदरात वाढ केली आहे. तर बांगलादेश सरकारने नऊ देशांकडून कांदा खरेदी करण्यासाठी करार केलेला आहे. भारतानेसुद्धा परकीय बाजारपेठेमध्ये आपले वर्चस्व कायम राहण्यासाठी निर्यातीला पोषक असे धोरण ठरवले पाहिजे, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.
कमाल २४९४ रुपये दर
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळ कांद्याला किमान ८०१ कमाल २४९४ रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी २२०१ रुपये असा दर मिळाला. नाफेडपेक्षाही जास्तीचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे.
हेही वाचा :