राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारल्याने संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झाले असून राज्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती ओढवली आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरीदेखील चिंतातूर झाले आहे. धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. विक्रमी पाऊस असणाऱ्या सुरगाणा व पश्चिम पट्ट्यात पावसाने पाठ फिरवली असून पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरण क्षेत्रात कमी पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाच्या खंडामुळे पिके करपली आहेत. परिणामी शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातील ५४ मंडळामध्ये अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत त्यांना भरघोस मदत जाहीर करावी. शासनाने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती मदत व नुकसानभरपाई देण्याबाबत निर्देश करावे, अशीही मागणी पवार यांनी केली.
हेही वाचा :