नको ओवाळणी.. नको खाऊ…सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम | पुढारी

नको ओवाळणी.. नको खाऊ...सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना राखी पाठविणार आहे. त्या माध्यमातून ‘नको ओवाळणी.. नको खाऊ.. सातवा वेतन आयोग द्या’ असे साकडे घातले जाणार आहे.

राखी अभियान ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्वच आगारात राबविण्यात येणार आहे. रक्षा बंधननिमित्त आगळावेगळा आंदोलनात्मक उपक्रम महिला वाहक-कर्मचारी भगिनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री महोदयांना राखी पाठवून सातवा वेतन आयोगाची हक्काची मागणी ओवाळणी म्हणून मागणार आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे कुटूंब आर्थिक सक्षम करण्यासाठी सातव्या वेतन आयोगाची गरज आहे. ‘घ्या निर्णय वेगवान व करा महाराष्ट्र गतिमान’ हे महाराष्ट्र शासनाने घोषवाक्य अमंलात आणून तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पोस्टाने एक-एक राखी पाठवावी व झोपलेल्या राज्य सरकारला झोपेतून उठण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवावा, असे आवाहन केले आहे.

… म्हणून ओवाळणीची मागणी

काही वर्षांपूर्वी मुंबई येथे आझाद मैदानावर ऐतिहासिक बेमुदत आंदोलन करुन तत्कालीन सरकारला जाग आली नव्हती. सध्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येत महाराष्ट्राचा विकासाला सुरूवात केली. तसाच विकास एसटी महामंडळाचा करुन कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button