मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? महाराष्ट्र एटीएसकडून चौकशी सुरु | पुढारी

मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? महाराष्ट्र एटीएसकडून चौकशी सुरु

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा

‘पीएफआय’शी निगडीत पदाधिकार्‍यांच्या धरपकडने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या मालेगावातील एका विवाहितेने दुबईत एका पाकिस्तानी पुरुषाशी निकाह केल्याची चर्चा असून, याबाबत संबंधित महिला आणि तिचा पहिला पती यांची महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने चौकशी सुरु केल्याचे वृत्त आहे. परंतु, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाविषयी अनभिज्ञता दर्शविल्याचे अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आपल्या स्तरावर घेतलेल्या माहितीत सद्यातरी चौकशीतून आक्षेपार्ह बाब समोर आली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

मालेगावातील एका चार मुलांच्या आईने दुबईत पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केल्याचा दावा करणारा ई-मेल तपास यंत्रणांना मिळाला आहे. या पाकिस्तानी नागरिकाचे नातेवाईक आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमध्ये कार्यरत असल्याचाही त्यात दावा असल्याने त्या अनुषंगाने महाराष्ट्र एटीएसकडून चौकशी होत आहे. या महिलेने पाकिस्तानी व्यक्तीसोबत दुबईसह काही देशांचाही प्रवास केला असून ही महिला 4 ऑगस्ट रोजी मालेगावात परतली आणि त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी हा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाल्याचे बोलले जाते.

स्थानिक पोलिसांसह मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, सीआयएसएफ आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनाही हा ई-मेल पाठवण्यात आला होता. ही महिला सध्या मालेगाव येथे आई-वडिलांसोबत राहते. या महिलेचा विवाह 2011 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यावसायिकाशी झाला होता. गतवर्षी डिसेंबरमध्ये तिने पतीचे घर सोडले होते. तिच्या पतीने 23 डिसेंबर 2022 रोजी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या महिलेच्या पतीचीही एटीएस आणि आयबी अधिकार्यानी चौकशी केली आहे. सदर महिला 4 ऑगस्ट रोजी भारतात परतली आणि 18 ऑगस्टला मेल आल्याने तपास यंत्रणांकडून मेल पाठवण्यामागे काही कारस्थान असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाविषयी स्थानिक पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. तरी संबंधित महिलेच्या चौकशीतून काही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.

हेही वाचा :

Back to top button