रक्षाबंधन विशेष : भावाने केले बहिणीच्या आयुष्याचे रक्षण; किडनीची ओवाळणी देत दिले नवे जीवन | पुढारी

रक्षाबंधन विशेष : भावाने केले बहिणीच्या आयुष्याचे रक्षण; किडनीची ओवाळणी देत दिले नवे जीवन

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : बहीण-भावाच्या नात्यातील अतूट प्रेमाचे नाते जपणारे रक्षाबंधन आगळ्या पद्धतीने साजरे करून एका भावाने जगण्यासाठी धडपडणार्‍या बहिणीला आपली किडनी देऊन नव्या आयुष्याची ओवाळणी दिली आहे.

देगलूर येथील विजया शिंगाडे (45) यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तब्येत खालावत चालल्याने हातावर पोट असणारे त्यांचे कुटुंब खचले होते. अशा परिस्थितीत बहिणीच्या मदतीला भाऊ सुरेश गरबडे धावून आले. आपली पर्वा न करता त्यांनी धाकट्या बहिणीला स्वतःची किडनी देऊन तिच्या जीवनात आनंदाचा अंकुर फुलवला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये विजया यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या दोघांची प्रकृती उत्तम आहे.

रक्षाबंधनानिमित्त भावाने बहिणीला भेटवस्तूची ओवाळणी द्यायची असते. मात्र, माझ्या मामांनी स्वतःची किडनी देऊन माझ्या आईला नवे आयुष्य दिल्याची भावना विजया यांची कन्या श्वेता हिने व्यक्त केली. गरबडे यांनी बहिणीला किडनी देण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली. मात्र, त्यांना बिडीकाडीचे व्यसन होते. ते आधी सोडावे, अशी अट त्यांना डॉक्टरांनी घातली. ते सोडल्यानंतर सहा महिन्यांनी डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली.

Back to top button