‘पुढारी’च्या महासर्वेक्षणात महाराष्‍ट्राचा कौल : महाराष्ट्र नरेंद्र मोदींच्याच पाठीशी! | पुढारी

'पुढारी'च्या महासर्वेक्षणात महाराष्‍ट्राचा कौल : महाराष्ट्र नरेंद्र मोदींच्याच पाठीशी!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन लोकसभा निवडणुकींप्रमाणेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशीच राहाणार असल्याचे पुढारी माध्यम समूहाने केलेल्या महासर्वेक्षणात समोर आले आहे. महाराष्ट्राचा कानाकोपरा पालथा घालीत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 32 ते 36 जागा मिळतील, विरोधकांच्या इंडिया आघाडीला 12 ते 16 जागा मिळतील.

पुढारी माध्यम समूहाच्या वतीने महाराष्ट्रात महा सर्वेक्षण घेण्यात आले. त्याचे निष्कर्ष जाहीर झाले. महाराष्ट्रात राजकीय सारीपाटावर गेल्या वर्षभरात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांना अधिक महत्त्व आहे. शिवसेनेचे ठाकरे गट, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची राज्याच्या राजकारणात एंट्री झाल्याने लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल याची अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता होती.

सर्वेक्षणानुसार राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 32 ते 36 जागा एनडीएच्याच पारड्यात पडणार असल्या तरी मूळ शिवसेना दुरावल्याचा भाजपला फटका बसताना दिसत आहे. ठाकरे गट इंडिया आघाडीत गेल्याने त्यांना त्याचा लाभ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीतील फूट, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, कर्नाटकमधील विजय यामुळे काँग्रेस आपली मतपेढी सावरताना दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत एक आकडी जागा मिळवणार्‍या विरोधकांना यावेळी मात्र 12 ते 16 जागा मिळत असल्याचे सर्वेक्षणात दिसून येते.

भाजपला 39 टक्के

महाराष्ट्रात भाजपच पहिल्या क्रमांकावर असल्याचे सर्वेक्षण सांगते. त्यानुसार राज्यात भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 17 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 13 टक्के, शिवसेना शिंदे गटाला 6 टक्के, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 10 टक्के, अजित पवार गटाला 4 टक्के तर इतरांना 11 टक्के पसंती महाराष्ट्राने दिली आहे.

मोदी यांना सर्वांचीच पसंती

विरोधकांनी विविध प्रश्नांवर मोदी सरकारवर निशाणा साधला असला तरी मोदी यांच्या कामगिरीवर सर्वसाधारण शिक्कामोर्तब मतदार करीत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. सर्वसाधारण मोदी सरकारविषयी समाधानी असणार्‍यांचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे. त्यात 38 टक्के महिलांचीही मोदींनाच पसंती दिसून येते. तरुणांच्या मनात आजही नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भक्कम असल्याचे सर्वेक्षण सांगते.

योजनांचे यश महत्त्वाचे

मोदी सरकारच्या कामगिरीबाबत विचार करताना तळागाळात पोहोचलेल्या योजनांचे यश याचा मोठा वाटा असल्याचे सर्वेक्षण सांगते. प्रधानमंत्री आवास योजना, कृषी सन्मान योजना, उज्ज्वला योजना, डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यात पैसे जमा होणे, 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य आदी योजनांचा लाभ होताना दिसत असल्याने या योजनांचे यश मोदी यांची लोकप्रियता अबाधित राखण्यात यशस्वी ठरले आहे.

राहुल गांधी दुसर्‍या स्थानावर

देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देशाचे आगामी पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचे महापोलमधून स्पष्ट झाले आहे. या पदासाठी दुसर्‍या क्रमांकाची पसंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांना असली तरी ती मोठ्या फरकाने आहे. तिसरी पसंती भाजपचेच नितीन गडकरी, तर चौथी पसंती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार यांना आहे.

60 हजार जणांची जाणून घेतली मते

राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांतून 60 हजारांवर मतदारांची मते या पोलअंतर्गत नोंदविण्यात आली. सर्व जाती, लिंग, वयोगट, व्यवसाय गटांचा प्रातिनिधिक स्वरूपात समावेश करून ‘पुढारी’च्या पत्रकारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीअंती पत्राद्वारे ही मते नोंदविली.

मतांची विभागणी

महाराष्ट्रातील पहिल्या पसंतीचा पक्ष भाजप ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या मतांची मोठी विभागणी झाली आहे. काँग्रेस मोठ्या फरकासह दुसर्‍या स्थानी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष निर्णायक भूमिका बजावण्याच्या स्थितीत नसल्याचेही या महापोलमधून समोर आले आहे.

विभागनिहाय पसंतीक्रम

पश्चिम महाराष्ट्रात एनडीएला 48 टक्के पसंती आहे, तर इंडियाला 45 टक्के पसंती आहे. एनडीएअंतर्गत भाजपला 36 टक्के, शिवसेना शिंदे गटाला 4 टक्के, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 टक्के पसंती आहे. इंडिया आघाडीअंतर्गत काँग्रेसला 18 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 9 टक्के, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18 टक्के पसंती आहे. प. महाराष्ट्रातूनच पंतप्रधानपदासाठी मोदींना 39 टक्के, राहुल गांधींना 24 टक्के, शरद पवारांना 16 टक्के, तर गडकरींना 13 टक्के पसंती आहे.

कोकणातून मोदी व एनडीएला अनुक्रमे 47 टक्के आणि 54 टक्के, राहुल गांधी व इंडिया आघाडीला अनुक्रमे 17 टक्के आणि 36 टक्के पसंती आहे.

खानदेशातून मोदी व एनडीएला अनुक्रमे 43 टक्के आणि 51 टक्के, राहुल गांधी व इंडिया आघाडीला अनुक्रमे 19 टक्के आणि 40 टक्के पसंती आहे.

मराठवाड्यातून मोदी व एनडीएला अनुक्रमे 45 टक्के आणि 50 टक्के, राहुल गांधी व इंडिया आघाडीला अनुक्रमे 24 टक्के आणि 42 टक्के पसंती आहे.

विदर्भातून मोदी व एनडीएला अनुक्रमे 48 टक्के आणि 51 टक्के, राहुल गांधी व इंडिया आघाडीला अनुक्रमे 31 टक्के आणि 21टक्के पसंती आहे.

Back to top button