तलाठी पेपरफुटीमागे रॅकेट? पोलिसांचे पथक संभाजीनगरला रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात तलाठी पदासाठी ऑनलाइन लेखी परीक्षा सुरू आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हसरूळमधील एका केंद्रामध्ये पेपरफुटीचा प्रकार समोर आला होता. हायटेक पद्धतीने पेपर फोडल्या प्रकरणी मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी गुसिंगे टोळीने विविध शासकीय- निमशासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेचे पेपर फोडले असून, ते पेपर फोडण्यात तरबेज असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
म्हसरूळ येथील वेब इन्फोटेक सोल्युशन या केंद्रात तलाठी पेपरफुटी प्रकरणी गणेश शामसिंग गुसिंगे (२८, रा. संजारपूरवाडी, परसाेडा, ता. वैजापूर), सचिन नायमाने, संगीता रामसिंग गुसिंगे यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित गणेश गुसिंगे हा अट्टल पेपरफोड्या असून, पेपर फोडण्यासाठी त्याने टोळी तयार केल्याचा संशय आहे. त्यामुळे गुसिंगेचा कोणी साथीदार आहे का, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, गुसिंगे याचा समावेश पिंपरी-चिंचवड पोलिस भरतीमधील फरार संशयितांमध्ये आहे. तसेच म्हाडा पेपरफुटीमधीलही तो फरार संशयित आहे. नुकत्याच झालेल्या वनविभागाच्या भरतीमध्ये त्याने हायटेक साहित्य वापरून कॉपी केल्याचे समजते. फरार संशयिताला पकडण्यास पोलिस अपयशी ठरल्याने तलाठी परीक्षेत गैरप्रकार घडल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
पोलिसांचे पथक संभाजीनगरला रवाना
गणेश गुसिंगे त्याचा पूर्वेतिहास पाहता तलाठी पेपरफुटीमागे मोठे मासे सक्रिय असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली असून, गुसिंगेच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस पथक रवाना झाले आहे. गुसिंगेकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्य-साधनांची तपासणी केली जात आहे. त्यातूनही काही धागेदोरे हाती लागण्याचा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला.
हेही वाचा :