लवंगी मिरची : भरतीचा विक्रम..! | पुढारी

लवंगी मिरची : भरतीचा विक्रम..!

मंडळी, काय गंमत आहे पाहा! साडेचार हजार शासकीय पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात नुकतीच आली. तसे पाहिले, तर ही नियमित प्रक्रिया आहे. नोकर्‍यांच्या जाहिराती येणार, त्यासाठी अनेक लोकांचे अर्ज येणार आणि त्या प्रक्रियेमधून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर काही नशीबवान लोक त्या पदावर बसणार हे ठरलेलेच आहे. साडेचार हजार पदांसाठी दहा लाख बेचाळीस हजार अर्ज आले, ही खरी धक्कादायक बातमी आहे. हे दहा लाख बेचाळीस हजार अर्ज आपल्या राज्याच्या एकूण छत्तीस जिल्ह्यांमधून आले आहेत. हे अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना सरसकट एक हजार रुपये शुल्क लावण्यात आले होते. या भरती प्रक्रियेमधून शासनाला किती रुपये मिळाले असतील? हा जमा झालेला रकमेचा आकडा चकित करणारा आहे. सुमारे एक अब्ज चार कोटी सतरा लाख रुपये शासनाकडे जमा झाले. बहुदा आजपर्यंतच्या नोकर भरतीचा हा विक्रम असेल.

आता तुम्ही म्हणाल, असे कोणते पद होते की त्यासाठी इतक्या लोकांनी उड्या टाकल्या? होय, पदही तसेच महत्त्वाचे आणि आकर्षक आहे. ‘जे नसे ललाटी ते लिही तलाठी’ अशी ज्या पदाबद्दल ख्याती आहे त्या तलाठ्यांच्या पदासाठी हे अर्ज होते. आता तुमच्या लक्षात आले असेल की, इतक्या प्रचंड प्रमाणावर अर्ज का आलेले असावेत? तलाठी हा महसूल व्यवस्थेचा कणा आहे आणि महसूल व्यवस्था ही शासनाच्या सर्वसामान्य प्रशासनाची गुरुकिल्ली आहे.

मंत्री महोदयांनी आदेश काढलेले असोत की, जिल्हाधिकारी यांनी काढलेले असोत, या सर्व आदेशांची अंमलबजावणी करणारा मुख्य वर्ग तलाठी हाच आहे. त्यामुळे अतिशय मोक्याचे हे पद मिळवण्याची इच्छा तरुणवर्गाला झाली नसती, तरच नवल होते. शासनाकडे जमा झालेल्या रकमेचा आकडा पाहून अनेकांचे डोळे गरगरले आणि अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली की, शासनाने आपले उत्पन्न वाढवण्याचा हा एक नवीन मार्ग तयार केला आहे की काय? तूर्तास ते समजण्याची समजण्याची शक्यता नाही.

संबंधित बातम्या

ग्रामीण भागात तर तलाठी हे स्वतंत्र संस्थान असते. कामाचा व्याप पाहता तलाठी महोदयांनी स्वतःच्या खर्चाने तीन-चार सहायक नेमलेले असतात. म्हणजे बघा, शासनाचे काम करण्यासाठी पदरचे पैसे खर्च करणारा एकमेव कर्मचारी म्हणजे तलाठी असतो. सातबारा नावाचा अमूल्य दस्तावेज असो, पेरा टाकण्याची नोंद असो, की नुकसान भरपाईचे पंचनामे असोत, अत्रतत्र सर्वत्र तलाठीच असतो. तलाठी महोदयांकडे त्यांच्या कार्यक्षेत्रामधील वेगवेगळे सज्जे दिलेले असतात आणि या प्रत्येक सज्जातील प्रत्येक घडणार्‍या घटनेवर तलाठी मंडळींचा कब्जा असतो.

कुणाला जमीन घ्यायची असो की विक्री करायची असो, त्या जमिनीची अधिकृत माहिती तलाठी महोदयांच्या रेकॉर्डमध्ये असते. कोणत्या जमिनीमध्ये किती लोकांचे वाटे आहेत, त्यातील ती जमीन विक्री होत असेल, तर भावकीमधील कोण कोण सह्या करण्यास तयार आहेत, कोणत्या जमिनी वादग्रस्त आहेत, कोणत्या जमिनीचे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे याची इत्थंभूत माहिती याच अधिकार्‍याला असते. त्यामुळे जमिनीचा कोणताही व्यवहार होत असेल, कोणत्याही जमिनीचा फेरफार होत असेल किंवा शहरांमध्ये प्लॉटिंग होणार असेल अशा सर्वांच्या केंद्रस्थानी असणारी व्यक्ती म्हणजे तलाठी हीच असते. साहजिकच तलाठ्याची पदे निघाल्यानंतर त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या उड्या पडणार, हे ठरलेले आहे.

Back to top button