नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान, सोपवला आरोग्यचा प्रभार | पुढारी

नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान, सोपवला आरोग्यचा प्रभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेत सह वैद्यकीय अधिकारी असतानाही, खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यासह अनधिकृतपणे सोनोग्राफी मशिन ठेवल्याप्रकरणी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यावर बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आहे. शिवाय न्यायालयात हे प्रकरण असताना महापालिकेने डाॅ. भंडारींकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रभार सोपवला आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले असून, ही मेहरबानी प्रशासन उपआयुक्तांची की मागील प्र. आयुक्तांनी दाखवली हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी महापालिका आरोग्य अधिकारी डाॅ. बापूसाहेब नागरगोजे यांची नगरला बदली झाली. त्यामुळे हे पद रिक्त होते. या जागी प्रभारी म्हणून वादग्रस्त डाॅ. भंडारींकडे जबाबदारी सोपविण्यात आली.

मनपा क्षेत्रात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कारवाईची जबाबदारी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असते. पण पालिकेच्याच सहायक वैद्यकीय अधिकारी व बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे सोनोग्राफी मशीन आढळून आले होते. मागील १६ डिसेंबरला नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरात श्री बालाजी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या पथकाने छापा टाकत अनधिकृत सोनोग्राफी मशीन सील केले. विशेष म्हणजे या रुग्णालयाचा परवानादेखील नव्हता. रुग्णालयाची इमारत ही डॉ. भंडारी यांच्या मालकीची असून, अनधिकृतपणे त्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू होते. या प्रकरणी महापालिकेकडून डॉ. भंडारी यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला. नाशिकरोडच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारींच्या न्यायालयात डॉ. भंडारी दांपत्यासह शुभम हॉस्पिटलचे तत्कालीन संचालक असलेले सहा डॉक्टर आणि हॉस्पिटल एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेणारे एक डॉक्टर अशा नऊ डॉक्टरांविरोधात खटला सुरू आहे.

केलेली घाई संथयास्पद

मागील पंधरा दिवसांपासून आरोग्यचे पद रिक्त होते. प्र. आयुक्तांकडून याबाबत निर्णय घेतला जात नव्हता. पण नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्याच्या दिवशीच अगदी घाईघाईत डाॅ. भंडारींकडे आरोग्यचा प्रभार सोपविण्यात आला. या सर्व घडामोडी पाहता निश्चितच संशयास वाव मिळत आहे.

मी आजच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे प्रकरणाविषयी माहिती नाही. याविषयी माहिती घेतली जाईल.

– डाॅ. अशोक करंजकर, आयुक्त महापालिका

हेही वाचा :

Back to top button