अहमदनगर : अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : घरफोडी व चोर्या करणारा सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कर्जतमधून अटक केली आहे. भगवान ईश्वर भोसले (वय 22, रा. बेलगाव, ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकल असा दोन लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली आहे.
कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे एक जण गावठी कट्टा विक्री करण्यासाठी विनानंबरच्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या आधारे एलसीबीच्या पथकाने रविवारी (दि.23) संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडे गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे मिळून आले. कट्टा व चार काडतुसे विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली आरोपीने दिली.
सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने साथीदार संदीप ईश्वर भोसले, विशाल उद्धव काळे (दोन्ही रा. बेलगाव, ता.कर्जत) यांच्या मदतीने श्रीगोंद्यातील लक्ष्मीनगर व कर्जतमधील वडगाव तनपुरा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. तीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, बाराशे रुपये किमतीची चार काडतुसे, साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, अठरा हजार रुपये किमतीचे सोन्याची कर्णफुले व मणी, दहा हजार रोख, एक लाख रुपये किमतीची मोटारसायकल असा दोन लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भगवान भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नगर व बीड जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, घरफोडी व चोरीचे 22 गुन्हे दाखल आहेत. उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हवालदार बापुसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, भीमराज खर्से, संतोष खैरे, हवालदार भाऊसाहेब काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अमोल कोतकर यांनी कारवाई केली.
हेही वाचा
लाभांश की एसडब्ल्यूपी, गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला?