त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील देवगाव येथील आश्रमशाळेत इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सुगंधा काशीनाथ वारे (14) हिचा दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास आश्रमशाळेतील सर्व मुली झोपलेल्या असताना सुगंधाच्या खोलीतील काही मुलींनी तेथे मुक्कामी असलेल्या एका शिक्षकाला येऊन, सुगंधाला उलट्या होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिला उलट्यांबरोबरच तोंडाला फेस येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील कर्मचाऱ्याने तत्काळ खासगी गाडीमधून खोडाळा येथे उपचारासाठी नेले. मात्र, तेथे खासगी डॉक्टरने तपासून तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, विद्यार्थिनीच्या अचानक मृत्यूने इतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण होते. तिचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल राखून ठेवल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. तर शाळेच्या शिक्षकाने दोन वर्षांपूर्वी तिच्या हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया झाली असल्याचे सांगितले आहे.
देवगाव आश्रमशाळा नेहमीच चर्चेत
देवगाव येथील आश्रमशाळा तालुक्यातील सर्वात जुनी आहे. मात्र, ती कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. येथे 400 आदिवासी मुली शिक्षण घेतात. मात्र, आदिवासीविकास विभागाकडून या शाळेकडे दुर्लक्ष झालेले आहे. मागील वर्षी जेवणातून अन्न विषबाधा झाल्याची तसेच मासिक पाळी आहे म्हणून वृक्षारोपण करता येणार नसल्याच्या प्रकरणांनी ही शाळा चर्चेत आली होती.
हेही वाचा :