आमदार सरोज अहिरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर घेणार निर्णय | पुढारी

आमदार सरोज अहिरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर घेणार निर्णय

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या सद्यस्थितीत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मुंबईहून परतल्यानंतर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेसोबत चर्चा केली जाणार आहे. चर्चेअंती आपण शरद पवार यांच्यासोबत राहायचे की, अजित पवार यांना साथ द्यावयाची याविषयी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरम्यान आमदार सरोज अहिरे सध्या मुंबई येथे असून, त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आमदार अहिरे नेमक्या कुणाच्या बाजूने आहेत, याविषयी मतदारसंघात संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. त्यांच्याविषयी मतदारसंघात वेगवेगळी तसेच उलट सुलट चर्चा केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मतदारसंघात परतल्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांना आपला निर्णय कळविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिकरोड राष्ट्रवादीत संभ्रमवस्था

नाशिकरोड विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक बोलविली होती. बैठकीत आपण नेमकी काय भूमिका घ्यावी, याविषयी विचारविनिमय झाला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहावे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दर्शवायला हवा, याविषयी ठोस निर्णय होऊ शकला नाही. बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल शरद पवार यांच्या बाजूने होता. मात्र अजित पवार सत्तेत आहेत तेदेखील कणखर नेतृत्व आहे. त्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी, याविषयी एकमत होऊ शकले नाही. सद्यस्थितीत वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी, याविषयी बैठकीत एकमत झाले.

विभाग अध्यक्ष कोरडे शरद पवारांच्या बाजूने 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. कोरडे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे मानले जातात. त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पदाधिकाऱ्यांना फोन 

जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. विशेष म्हणजे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनानंतर हा संपर्क साधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे समजते.

हेही वाचा : 

Back to top button