नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त | पुढारी

नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपघाताचा बनाव करून मद्यसाठ्याचे नुकसान झाल्याचे भासवून मद्यचोरी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छडा लावला आहे. या प्रकरणी विभागाने सहा संशयितांना पकडून त्यांच्याकडून ३२ लाख १८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिंडोरी तालुक्यातील एका कंपनीतून ८ जून रोजी (क्र. एमएच ४६, एएफ ५८६०) ट्रकमधून ९६० खोके मद्यसाठा नांदेड येथे पाठवला जात होता. जिंतूर-परभणी रोडवर या ट्रकचा अपघात झाला. त्यानंतर ट्रकमधील मद्यसाठ्याची मोजदाद केली असता मद्यसाठा कमी आढळून आला. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात मद्यचोरीचा गुन्हा दाखल आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी चौकशी केली. त्यात ट्रकच्या प्रवासाची माहिती घेत व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम यंत्रणेच्या मदतीने ट्रक कोठे व किती वेळ थांबला, त्याचा प्रवास मार्ग याची माहिती मिळवली. भरारी पथकातील निरीक्षक सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महामार्ग वाडीवऱ्हे येथे कारवाई करीत (क्र. एमएच १५, ईजी ६६८०) वाहनातून १०० खोके मद्यसाठा जप्त केला. येथून दोन संशयितांची धरपकड करण्यात आली. तर निरीक्षक जी. पी. साबळे यांच्या पथकाने खंबाळे व धामणी शिवारातील हॉटेल सारेगामा येथे कारवाई करीत दोघांकडून ५४ खोके मद्यसाठा जप्त केला. तर निरीक्षक योगेश सावखेडकर व अरुण चव्हाण यांच्या पथकाने वडनेर दुमाला शिवारातून २०० खोके मद्यसाठा जप्त केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, मनोहर गरुड यांच्यासह राहुल केदारे, धीरज जाधव, भावना भिरड, विष्णू सानप, अमित गांगुर्डे, सुनील दिघोळे, राकेश पगारे, संतोष कडलग आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

या संशयितांची धरपकड

पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत संशयित संदीप भास्कर गायकर, राजेंद्र भागवत पवार, धनंजय निवृत्ती भोसले, रोहित देवीदास शिंदे, अजीज फैजुल्ला शेख, अजित ओमप्रकाश वर्मा यांना पकडले आहे. त्यांच्याकडून ३५४ खोके मद्यसाठा व पिकअप वाहन जप्त केले आहे.

अपघाताचा बनाव फसला

संशयितांनी संगनमत करून मद्यसाठ्याची जिल्ह्यातच चोरी केली. त्यानंतर प्रवासात वाहनाचा अपघात होऊन मद्यसाठ्याचे नुकसान झाल्याचे भासवून चोरी पचवण्याचा तसेच विमा कंपनीकडून मद्याचा विमा क्लेम करून आर्थिक मोबदला घेण्याचाही कट संशयितांनी रचला. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाने या टोळीचा पर्दाफाश केल्याने त्यांचा डाव फसला.

हेही वाचा : 

Back to top button